चक्क चौदाशे किलोमीटरचा प्रवास...अन् तोही सायकलवर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

 पानिपतच्या युद्धाला 259 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पानिपतच्या युद्धात अनेक सैनिकांचा पराभव झाला होता. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी डॉ. आबा पाटील यांच्या संकल्पनेतून ही पानिपत मोहीम आखण्यात आली होती. नाशिकला पोहचताच या सायकलपटूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यातील 36 सायकलपटूंनी तब्बल एक हजार 410 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करून पानिपत ते नाशिकपर्यंतची मोहीम यशस्वी केली. यात तीन येवलेकर सायकलपटूंचादेखील समावेश होता. पानिपतच्या युद्धाला 259 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 
पानिपतच्या युद्धात अनेक सैनिकांचा पराभव झाला होता. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी डॉ. आबा पाटील यांच्या संकल्पनेतून ही पानिपत मोहीम आखण्यात आली होती. 

सलग नऊ दिवसांत एक हजार 410 किलोमीटर सायकल प्रवास
 
सहभागी सर्वजण नाशिक येथून 13 जानेवारीला पहाटे तीनला रेल्वेने प्रवास करीत 14 जानेवारीला पहाटे सातला पानिपत येथे पोहचले. सायकल व बॅगा अगोदरच ट्रकने पुढे पोचविल्या होत्या. 14 जानेवारीला पानिपतच्या काला आंब येथून नाशिक, गंगाखेड, येवला, देवळा, संगमनेर, सिन्नर, नगर येथील 21 ते 71 वयोगटांतील 36 सायकलवीरांचा प्रवास सुरू झाला आणि 22 जानेवारीपर्यंत सलग नऊ दिवसांत एक हजार 410 किलोमीटर सायकल चालवित नाशिकला पोहचले. या काळात हरियाना, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यातून प्रवास केला. नाशिकला पोहचताच या सायकलपटूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या 36 सायकलपटूंनी पूर्ण केली पानिपत ते नाशिक मोहीम 

या मोहिमेत समन्वयक डॉ. आबा पाटील, येवल्यातील राजेंद्र कोटमे, अरुण थोरे, योगेश गावंडे, तसेच संजय पवार, जयराम ढिकले, प्रशांत तिवारी, अरुण काळे, अजय पाटील, कैलास बोडके, रत्नाकर शेवाळे, रावसाहेब शिंदे, प्रकाश वाकळे, चंद्रकांत देसाई, कैलास गायकर, प्रशांत अमरापूरकर, उल्हास कुलकर्णी, चंद्रशेखर बर्वे, काशीनाथ देसाई, रमेश धोत्रे, श्रीराम पवार, राज पालवे, दिनकर पाटील, प्रकाश पगार, राजेंद्र गुंजाळ, भूषण गाणे, लक्ष्मीकांत पाटील, अमोल पवार, अभिजित अत्रे, विनायक वारुंगसे, मुकुंद ओक, अनिल वराडे, विकास मंडळ, सुदर्शन जाधव, चंद्रशेखर मुळे, संजय वाघ आदींनी सहभाग घेतला. 

हेही वाचा >  माझा काय दोष..मी का "नकोशी"? लुकलुकत्या डोळ्याने 'तिने' जणू विचारले...

आठवणींना उजाळा देऊन व नतमस्तक होणे एक नवा आत्मविश्‍वास

पानिपतचे तिसरे महायुद्ध जिथे झाले अशा भूमीवर आपल्या मराठी मातीच्या वीरांना अभिवादन म्हणून हा प्रवास 36 शिलेदारांसोबत केला. या शुरवीरांच्या आठवणींना उजाळा देऊन व नतमस्तक होऊन एक नवा आत्मविश्‍वास घेऊन आम्ही हा प्रवास पूर्ण केला. पानिपत येथील युद्धभूमीवरील माती घेऊन नाशिकला पोहचलो. - डॉ. आबा पाटील, सायकलस्वार व आयोजक,

सायकलप्रेम, पर्यावरणसंवर्धन अन्‌ ऐतिहासिक उपक्रमातील वेगळाच आनंद

सायखेडा, येवल्यात सायकल चालविणारा मोठा ग्रुप आहे. नाशिक येथून सायकलवर कोटमगावला येणारे डॉ. आबा पाटील यांनी या मोहिमेची माहिती देताच आम्ही सहभागी होण्याचा निश्‍चय केला. सायकलप्रेम, पर्यावरणसंवर्धन अन्‌ ऐतिहासिक उपक्रमातील सहभागाने वेगळाच आनंद झाला आहे. - राजेंद्र कोटमे, सायकलस्वार, व्यवस्थापक जगदंबा देवस्थान, कोटमगाव

हेही वाचा>रेल्वेस्थानकावर जोडीने फिरतोय 'तो'..जरा जपून!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 cyclists complete the Panipat-Nashik campaign nashik marathi news