Latest Marathi News | लाचखोर तलाठ्याला दोन वर्षांची शिक्षा; शहादा न्यायालयाचा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe Case Court Result

Nandurbar News : लाचखोर तलाठ्याला दोन वर्षांची शिक्षा; शहादा न्यायालयाचा निकाल

तळोदा : लाच घेणाऱ्यांना अटकेनंतर काय होते, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा पडतो. असे अधिकारी काही दिवसांनी सुटतात किंवा दुसऱ्या ठिकाणी रुजू तरी होतात. त्यामुळे या कारवाईबाबत अनेकदा समाजाकडून फारसे बोलले जात नाही.

मात्र तपासातील बारकावे, भक्कम पुरावा आणि सरकारी वकिलांची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे अशा लाचखोरांना शिक्षाही होत असते. येथील एका घटनेतील लाचखोराला दोन वर्षे कैदेची आणि दंडाची शिक्षा सुनावली. (Bribery Talathi sentenced to two years Judgment of Shahada Court Nandurbar News)

हेही वाचा: Jalgaon News : सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार

जमाना (ता. अक्कलकुवा) येथील तलाठी प्रवीण कर्णे यांना लाच प्रकरणाच्या अशाच खटल्याच्या सुनावणीमध्ये शहाद्याच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोषी ठरवत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोन वर्षे कैदेची व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाचे नागरिकांमधून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. न्यायालय आणि पोलिसांच्या तपासाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करीत अशा लाचखोरांना अद्दल घडलीच पाहिजे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मूळ तक्रारदार यांचे गदवाणी (ता. अक्कलकुवा) शिवारात गट नं. १/२ व ८/२ मध्ये साग, फणस, चिकू, आंबे, नारळ अशा प्रकारची झाडे लावलेली होती. या गट नं. मध्ये तक्रारदार यांचे नावे झाडांची नोंद होण्यासाठी तक्रारदार यांनी लोकसेवक तलाठी प्रवीण कर्णे (सजा जमाना, ता. अक्कलकुवा) यांच्याकडे अर्ज केलेला होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Dhule News : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कायम सेवेसाठी आंदोलन

परंतु या झाडांची नोंदणी करणेकामी तलाठीने ३० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना पंच साक्षीदार यांच्या समक्ष त्यांना पकडण्यात आले होते. त्यामुळे लोकसेवकाविरुद्ध लाच स्वीकारणे, तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लाचेची मागणी करून स्वीकारली म्हणून लोकसेवक श्री. कर्णे यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात सुनावणीमध्ये शहादा येथील जिल्हा व अति. सत्र न्यायाधीशांनी साक्षी व पुराव्यांचे आधारे दोषी ठरवून शनिवारी (ता. ७) एक वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास आणि १३ (१) (ड) सह १३ (२) मध्ये दोन वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंग गिरासे यांनी सरकारतर्फे कामकाज चालविले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. आर. बोठे, तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. व्ही. पगारे यांनी केलेला आहे. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलिस नाईक अमोल मराठे यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, कोणत्याही लोकसेवकाने नागरिकांकडे लाचेची मागणी केल्यास त्यांनी नंदुरबार कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबारचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा: Dhule Accident News : मद्यपी टँकर चालकाने धुळ्यात चिरडली वाहने