राज्यांप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाध्यक्ष पवारांचे निर्देश - छगन भुजबळ

chagan bhujbal0.jpg
chagan bhujbal0.jpg

नाशिक ः राज्य सरकारप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी महाराष्ट्र विकास आघाडी करण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच आघाडीमध्ये अधिक सदस्यांच्या पक्षाला अध्यक्ष, तर दोन क्रमांकांची सदस्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद व नंतर विषय समित्यांचे वाटप असे सूत्र राहणार असून त्यासंबंधीचा निर्णय स्थानिक नेते घेतील, असे ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे स्पष्ट केले. 

३० डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना भुजबळ यांनी विस्तार 30 डिसेंबरला होईल आणि त्याचदिवशी खातेवाटप होणार आहे. मंत्रीमंडळ विस्तारावरून महाघाडीतल्या कोणत्या पक्षात मतभेद नाहीत असा निर्वाळा देत त्यांनी उपमुख्यमंत्री अन्‌ गृहमंत्रीपदाबाबतच्या चर्चा माध्यमांमधून होत असल्याची माहिती दिली. भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसंबंधी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

कर्जमाफी लाभासाठी प्रशासनाने घ्यावी खबरदारी 
मागील सरकारच्या कर्जमाफीवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये 650 कोटी आले होते. हे पैसे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पीक कर्जासाठी देणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना 250 कोटींचे वाटप झाले. त्याबाबत मी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे आताच्या कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, की आताच्या कर्जमाफी योजनेत राज्यातील 30 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 21 हजार 216 कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना आखली जात आहे. याखेरीज शिवभोजन योजनेतंर्गत कोणत्याही प्रकारची जागा संस्थाना दिली जाणार नाही. बचतगटांना प्राधान्य दिले जाईल. 500 नागरिकांना जेवण देणे बंधनकारक असेल. त्यासाठी शहरी भागात 40, तर ग्रामीण भागात 25 रुपये अनुदान सरकार देईल. योजनेच्या देखरेखीसाठी स्वतंत्र पथक केले जाईल. 

पदांसाठी नेत्यांचे "लॉबिंग' 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि विषय समित्या सभापतींसह पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदांसाठी इच्छुक असलेल्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून श्री. भुजबळांची भेट घेतली. त्यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड्‌. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील पक्षीय बलाबलाची माहिती श्री. भुजबळ यांच्याकडे दिली. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. 

अजित पवारांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्‍लीन चीट बद्दल बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ठ प्रकरणात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही. त्याबद्दल "नो-कॉमेंटस्‌'. 
.

छगन भुजबळ म्हणतात... 
- विरोधकांच्या आमिषाला लोकप्रतिनिधींनी बळी पडू नये. सामाजिक-भौगोलिक परिस्थितीच्या जोडीला कितीवेळा निवडून आले आहेत याचा विचार सत्ताकारणातील पदांसाठी होईल 
- लोक सूचवतील तशी विकास कामे होतील. याशिवाय केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिकस्तरावरील प्रश्‍नांवर मार्ग काढत उद्योग टिकवण्याबरोबर वाढवण्यासाठी प्रयत्न राहील 
- रस्ते अन्‌ टोल हा वादाचा विषय. मागील सरकारने हुशारी करत रस्ते राष्ट्रीय महामार्गला दिले आणि त्यावर टोल लावला. लोकांना वाटल्यास त्याबद्दलचा पुनर्विचार होईल 
- मुंबईच्या प्रवेशद्वारावरील आणि मुंबई-पुणे मार्गावरील टोल बंद झाले नाहीत. आता मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीला पैसे नाहीत. रस्त्यांच्या विषय चारी बाजूने अडचणीचा ठरलाय 
- नाशिक महोत्सवासाठी धनादेशाने पैसे दिले. त्याचा खर्च नाशिककरांच्या सांस्कृतिक उपक्रमासाठी झाला. बॉलीवूड नाशिकमध्ये आले. मात्र त्यासंबंधाने आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आणि त्यावेळी कुणीही आमच्या बाजूने उभे राहिलेले नाही 
- अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील ट्‌विवटर वादावर आपली काहीही प्रतिक्रिया नाही 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com