धुळेकरांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ 

Coronavi
Coronavi

 
धुळे ः गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. प्रथमदर्शनी नागरिकांच्या बेफिकिरीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवत कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्यामुळे दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. 


धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत १४ हजार ३५७ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला. २० डिसेंबरला ८ रुग्ण, २१ डिसेंबरला २०, तर २२ डिसेंबरला ४७ रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या २३१ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. रुग्णवाढीचा दर पाहिला तर रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याला नागरिकांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे. 

...तर पूर्वीसारखी स्थिती 
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिक घराबाहेर पडताना मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत, बाजारपेठेतही अनेक जण विनामास्क फिरताना दिसतात. एवढेच नव्हे तर शारीरिक अंतरही ठेवत नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. धुळे जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर रुग्णसंख्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील रुग्णसंख्येपर्यंत पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही जिल्हाधिकारी यादव यांनी दिला आहे. 

अशी घ्या काळजी 
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. त्याच्या तीव्रतेचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ घेत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनीही सतर्कता बाळगत आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून आपले कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. नागरिकांनी अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, नियमितपणे मास्क वापरावा, हात वेळोवेळी साबण अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, वृद्धांची काळजी घ्यावी, ताप, खोकला असेल तर तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. सहव्याधी (को-मॉर्बिड) रुग्णांचा औषधोपचार नियमितपणे सुरू राहील याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com