Dhule News | अतिक्रमणांना समर्थन नाही, पण...... : नगरसेविका सारिका अग्रवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Encroachment in dhule

Dhule News | अतिक्रमणांना समर्थन नाही, पण...... : नगरसेविका सारिका अग्रवाल

धुळे : अतिक्रमण (Encroachment) काढायला आमचा विरोध असण्याचा प्रश्‍नच येत नाही. अतिक्रमणांना आमचे समर्थनही नाही. (Correspondent Sarika Agarwal statement about encroachment dhule news)

मात्र, कारवाई करताना खासगी मालमत्ताधारकांना त्रास होऊ नये, संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करून कार्यवाही करावी, अशी माफक अपेक्षा आहे, अशी भूमिका मनपा महिला बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सारिका अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकातून मांडली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान शिवारात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. मात्र, ही अतिक्रमणे हटविताना खासगी मालमत्ताधारकांवरही बुलडोझर चालविला जाणार असल्याची शंका आल्याने तेथे मोठी गर्दी झाली. यादरम्यान एकजण टॉवरवर चढला व आम्ही रीतसर मालमत्ता खरेदी केली आहे.

त्याची नोंद रजिस्टर कार्यालयाकडे आहे. आमची कागदपत्रे तपासून जी दुकाने अतिक्रमणात असतील तीच काढवीत, अशी मागणी नागरिकांनी केली. संबंधित नागरिकांसोबत आम्ही नेहमीच असतो. त्यामुळे आम्हाला नागरिकांकडूनच घटनास्थळी बोलविण्यात आले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

घटनास्थळी पोचल्यानंतर कोतकर कॉम्पेक्स व त्यासमोरील अ‍ॅड. मेहता यांच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी खरेदी करून घेतलेले गाळे बेकायदा कसे, असा सवाल विचारला. या गाळेधारकांनी खरेदीखताच्या प्रतीही आणल्या होत्या.

त्या ठिकाणी आम्ही सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, मोहाडी पोलिस ठाण्याचे एपीआय कोते यांना कागदपत्रे पाहून, अतिक्रमणाबाबत खातरजमा करून निर्णय घ्यावा, अतिक्रमणाला आमचे कोणतेही समर्थन नाही, मात्र खासगी मालमत्ताधारकांवर अन्याय होऊ देणार नाही, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, अशी भूमिका मांडली.

तसेच यापूर्वी आम्ही एनएचएआयशी सर्व्हिस रस्त्याबाबत पत्रव्यवहार केला होता, पथदीपांची व्यवस्था, खड्डे दुरुस्तीची मागणी केली होती, असे श्रीमती अग्रवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, एनएचएआयने अतिक्रमित शेड काढली आहेत.

या शेडच्या ठिकाणी छोटा-मोठा व्यवसाय करणारा व्यावसायिक त्यामुळे बेरोजगार झाला आहे. त्यामुळे एनएचएआयने पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी मागणीही श्रीमती अग्रवाल यांनी केली आहे.