esakal | धुळेकरांना एमजेपी, पीडब्ल्यूडीने लोटले मृत्यूच्या दारात!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule rod

धुळेकरांना एमजेपी, पीडब्ल्यूडीने लोटले मृत्यूच्या दारात!

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : वेगवेगळ्या मौलिक कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) (पीडब्ल्यूडी) आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (Maharashtra Jeevan Pradhikaran) (एमजेपी) जीवघेण्या खड्ड्यांविषयी धुळेकरांची चिंता, त्यांच्या जिवाची पर्वा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या (Shiv Sena) येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत देवपूरमधील जुन्या आग्रा रोडवरील (Agra Road) जीवघेणे खड्डे बुजवावेत, असा अल्टिमेटम एमजेपी आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, शिवसेनेची मागणी या विभागांनी धुडकावून लावली.
(dhule city citizens lives are in danger by bad roads)

हेही वाचा: मंत्रिपदाचा राजीनामा..पक्षत्याग..‘ईडी’ची चौकशी

शहरातील जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन परिसर, वाडीभोकर रोड आणि शहरातून जाणारा जुना मुंबई-आग्रा महामार्ग जीवघेण्या खड्डांमुळे धोकेदायक बनला आहे. त्याविषयी ‘पब्लिक क्राय’ ‘सकाळ’च्या माध्यमातून ऐरणीवर आला. ‘एमजेपी’च्या नियंत्रणातील भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ही स्थिती या जन्मात सुधारते की नाही, याविषयी सहनशील धुळेकरांना कुठलीही आशा-आकांक्षा उरलेली नाही. त्यात किमान शारीरिक व्याधी, वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारे जीवघेणे खड्डे, खचलेले रस्ते दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा धुळेकरांकडून व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या मागणीची दखल नाही
मात्र, एमजेपी, पीडब्ल्यूडी आणि भूमिगत गटार योजनेचा ठेकेदार या तीन घटकांनी धुळेकरांची चिंता, पर्वा तर सोडाच; परंतु मुख्यमंत्री लाभलेल्या शिवसेनेच्या येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दखलही घेतली नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. या तीन घटकांनी धुळेकरांना मरणाच्या दारातच लोटले असल्याची तीव्र भावना उमटत आहे.

हेही वाचा: दुचाकी अपघातात बापलेक अन मायलेकासह पाच जणांचा मृत्यू

जीवघेणे खड्डे झाले मोठे
महिनाभरात देवपूरमधील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील, भूमिगत गटारीसाठी खोदकाम झालेल्या मार्गावर जीवघेणे व धोकादायक खड्डे अद्याप बुजविलेले नाहीत. याउलट अधिकारी, ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि पावसामुळे आहे ते जीवघेणे खड्डे आकाराने मोठे झाले आहेत. रस्त्याच्या मधोमध झालेले असे खड्डे चुकविताना धुळेकरांचा जीव धोक्यात जात आहे. पावसात पथदिवे बंद झाले, तर जीव मुठीत घेऊनच वाहनधारक प्रवास करतो. या स्थितीशी एमजेपी, पीडब्ल्यूडी आणि ठेकेदाराला काहीही देणेघेणे नाही, असे दिसून येत आहे.

नगरसेवक करताय काय?
देवपूरमध्ये भाजपचे २३ ते २४ नगरसेवक आहेत. त्यांचेही या गंभीर स्थितीकडे लक्ष नाही. त्यांना संबंधित अधिकारी जुमानत नसल्याचा निष्कर्ष धुळेकर काढू लागले आहेत. जीवघेण्या खड्ड्यांप्रश्‍नी एमजेपी, पीडब्ल्यूडी आणि ठेकेदाराविरोधात देवपूरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे. एमजेपी-पीडब्ल्यूडीमध्ये खड्डे दुरुस्तीवरून तू- तू, मै- मै सुरू आहे. त्यात धुळेकर भरडले जात आहेत. याप्रश्‍नी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image