Dhule News : विहिर बांधायची म्हणून त्यांनी काबाडकष्ट करुन पैसा साठवला. परंतु, तो पुरेसा नसल्याने शेती गहाण ठेवत आणखी रक्कम उभी केली. जिद्दीने विहीर बांधली. रोज विहिरीकडे पाहून त्यांना मोठा आनंद मिळत होता. त्याच विहिरीने गुरुवारी (ता. २७) त्यांना पोटात घेतले. लालमाती (जोयदा, ता. शिरपूर) शिवारात गुरुवारी (ता. २७) दुपारी विहिर ढासळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून रेबा पांगव्या पावरा (वय ६०) व मीनाबाई रेबा पावरा (वय ५५, दोघे रा. सांगवी, ता. शिरपूर) यांचा मृत्यू झाला. सलग दोन तास पोकलेनचा वापर करुन माती काढल्यानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. या घटनेत महिलेसह दीड वर्षाचा बालक बचावला. ( Death of husband and wife due to well collapsed in shirpur marathi news)
चौघांची विहीरीकडे धाव
जोयदा शिवारातील लालमाती येथे रेबा पावरा यांच्या मालकीची सहा एकर शेती आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतात विहिर बांधली होती. शेतात गुरुवारी दुपारी काम करीत असताना त्यांना विहिरीच्या दिशेने मोठा आवाज आला. त्यामुळे त्यांच्यासह पत्नी मीनाबाई, संतूबाई भिकला पावरा व बालक तेजस पावरा यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली.
विहिरीत डोकावून बघत असतानाच अचानक त्यांच्या पायाखालची जमीन ढासळून सर्व जण विहिरीच्या खड्ड्यात फेकले गेले. त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. त्या वेळी मोठा आवाज झाल्याने शेजारच्या शेतातून शेतकरी, मजूर धावत गेले. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले.
दोघांचा जीव बचावला
संतूबाई आणि तेजस यांना बाहेर काढण्यात मदतकर्त्यांना यश आले. मात्र, रेबा व मीनाबाई यांनी विहिरीचा तळ गाठला होता. त्यांचे शरीर मातीच्या ढिगाऱ्याआड गेल्याने दिसत नव्हते. त्यामुळे पोकलेनद्वारे माती बाजूला करीत मदत कार्य सुरु झाले. काही वेळाने दोघांचे शरीर बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राणज्योत मालावली
लालमाती परिसरात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे स्वत:ची विहिर असावी यासाठी रेबा पावरा यांनी मोठी धडपड केली. शेतीपैकी काही भाग गहाण ठेवून पैसा उभा करीत विहिर बांधली. रोज शेतात गेल्यावर प्रथम विहिरीकडे जाणे व नंतर ते कामाला सुरूवात करीत होते. त्याच विहिरीच्या तळाशी त्यांनी व पत्नी मीनाबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भूस्तर रचनेमुळे घात
लालमाती परिसरातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार लालमाती परिसरात दगडांची उभी रचना आहे. त्यामुळे एक दगड ढासळला तरी संपूर्ण उतरंड कोसळते. या भागात विहिरी फारशा नाहीत. कूपनलिकाही माती ढासळल्याने निरुपयोगी ठरतात. या भूस्तर रचनेमुळेच रेबा पावरा यांची विहिरही ढासळून दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.