सोनगीर : धुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रामुख्याने धरणांभोवतीच फिरत आहे. मागील निवडणूक जामफळ, वाडीशेवाडी व अक्कलपाडा धरणांच्या मुद्यावरून गाजली. पाणीटंचाई, सुशिक्षित बेरोजगार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई आदींवर कोणी नेते बोलतच नाही. (Dhule Lok Sabha Constituency)
यंदाच्या निवडणुकीतही धरण हा प्रमुख मुद्दा दिसू लागला आहे. मात्र, पाणीटंचाई, बेरोजगारी, औद्योगिक विकासाचा अभाव, डबघाईला आलेले लघुउद्योग, बंद पडलेल्या तर काही सुरूच न झालेल्या गिरण्या यावर बोलायला प्रत्येक जण सोयीस्कररित्या विसरत आहे. शिंदखेडा व धुळे तालुक्यातील सीमेवर औद्योगिक विकास केंद्र वगळता अन्य मोठे प्रकल्प नाहीत.
जिल्ह्याचे राजकारण सतत धरणांभोवती फिरत राहिले, तेही थोडेथोडके नव्हे, तर चक्क ३५ वर्षे. त्यात प्रामुख्याने अक्कलपाडा, वाडीशेवाडी आणि आता जामफळ धरणाचा समावेश होतो. मनमाड- इंदूर रेल्वेमार्गातील सध्या नरडाणा ते बोरविहीर मार्ग होत असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे बजेटमध्ये पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही.
त्यासाठी प्रयत्न होत नाहीत, केवळ निवडणूक आली की धरणे अन रेल्वेमार्गाला उजाळा मिळतो. मुंबई- दिल्ली कॉरिडॉरबाबत सर्वपक्षीय नेते श्रेय घेत आहेत. अद्याप कोणत्याही टप्प्यावर कामाला सुरवात नाही की कोणता निधी मंजूर नाही. आठ वर्षांपूर्वी कॉरिडॉरबाबत प्रथमतः चर्चा झाली. एकूणच, विशेषतः महामार्गालगतच्या शेतजमिनीची किंमत गगनाला भिडली. (Latest Marathi News)
शेतजमिनीत प्लॉट्स पाडून विक्रीचा व्यवसाय वाढला. आठ वर्षांत कॉरिडॉरबाबत हालचाली गतिमान होण्याऐवजी थंडावल्या, तसा जनतेचाही अपेक्षाभंग झाला. दरम्यान तापी, पांझरा व बोरी नदीजोड प्रकल्प मध्यंतरी चर्चेत होता. अमळनेर, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील सीमेवरील गावांना याचा फायदा होईल.
मात्र, या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीच्या कोणत्या टप्प्यावर अडकून पडला, ते समजायला मार्ग नाही. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर सोनगीरच्या सूतगिरणीला निधी मिळून ती सुरू होईल, अशी स्वप्ने दाखवली गेली. तापी नदीतून जामफळ प्रकल्प भरून घेणाऱ्या प्रकल्पावर राजकारण जोरात आहे.
तेथून मालेगाव तालुक्यातील कनोली धरण भरणे अशी योजना असून काम वेगात सुरू आहे. २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार असे सांगितले जात होते, मात्र काम जोरात सुरू असले तरी प्रकल्प कधी पूर्ण होईल ते सांगता येत नाही. तापीच्या पाण्याने जामफळ भरेल तो दिवस धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ग्रामस्थांना स्वप्नवत ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.