Dhule Lok Sabha Election 2024 : दोन माजी मंत्री डॉक्टरांची प्रतिष्ठा पणाला! पक्षांतर्गत कडव्या विरोधाचा सामना करण्याचे आव्हान

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्याने काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत अनेक नावांच्या चर्चेबाबत गुऱ्हाळ सुरू होते.
Dhule Lok Sabha Election 2024
Dhule Lok Sabha Election 2024esakal

नामपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून 'कमळ' फुलल्याने महायुतीतर्फे भाजपकडून सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली. तेव्हापासून महाविकास आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता होती.

अनेक नावांच्या चर्चेनंतर नाशिकच्या माजी महापौर, माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची काँगेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकंदरीत लोकसभा रणसंग्रामामुळे माजी मंत्री असलेल्या दोन्ही डॉक्टरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Dhule Lok Sabha Election 2024 subhash bhamre shobha bachhav marathi news)

महाविकास आघाडीकडून धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्याने काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत अनेक नावांच्या चर्चेबाबत गुऱ्हाळ सुरू होते. त्यात मविप्र शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मालेगावचे माजी महापौर असिफ शेख, संगमनेरचे माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, कुपखेडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील आदींच्या चर्चेनंतर डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी निश्चित झाल्याने काँग्रेस उमेदवाराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मागील तीन निवडणुकांपासून या मतदारसंघावर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसचा गेलेला हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून राजकीय व्यूहरचना सुरू करण्यात आली होती.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला धुळे मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा लाभ निवडणुकीत उठविण्यासाठी काँग्रेसतर्फे सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता. माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यावर पक्षाने विश्वास दाखविला असला तरी त्यांच्या नावाला पक्षांतर्गत होणारा कडवा विरोधामुळे लोकसभेचे शिवधनुष्य कसे पेलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसचे धुळे आणि नाशिक जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने ग्रामीण भागातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, शिंदखेडा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. उमेदवारी देताना आतापर्यंत धुळे जिल्ह्याला झुकते माप असले तरी नाशिकमधील तीन मतदारसंघांची साथ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल, अशी शक्यता आहे.

डॉ. बच्छाव कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून, राजकारणात 'जायंट किलर' म्हणून त्यांची ख्याती आहे. नाशिक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आरोग्यमंत्री डॉ. डी. एस. आहेर यांचा पराभव केला होता.  (latest marathi news)

Dhule Lok Sabha Election 2024
Lok Sabha 2024 : निवडणूक प्रचारात सोशल हॅन्डलर्सची एन्ट्री, ‘सोशल मीडिया’चा वाढला वापर; इन्फ्लूएन्सर्स बनले आधुनिक प्रचारदूत

नाशिकच्या महापौर ते राज्याच्या आरोग्यमंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. आपले राजकीय कसब वापरून नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत काँग्रेसचा गेलेला हा बालेकिल्ला त्या जिंकणार की डॉ. सुभाष भामरे हॅटट्रिक मारणार याकडे उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस, भारतीय जनता पक्ष दोन्ही प्रमुख पक्षात मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी असल्याने अनेक ठिकाणी विरोधी पक्षांना बोनसरूपी मदत मिळेल. कसमादे येथील माहेरवाशीण असलेल्या शोभा बच्छाव यांच्या नात्यागोत्याची घट्ट वीण असल्याने साहजिकच त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचे भांडवल घेवून जनतेच्या दरबारात जाणाऱ्या डॉ. सुभाष भामरे यांना मतदारराजा कौल देतो, की माहेरची लेक असलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांना दिल्लीची वारी घडवितो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

विधानसभानिहाय मतदार संख्या अशी...

*धुळे ग्रामीण : ३,८९,०३१

*धुळे शहर : ३,३४,८४१

*शिंदखेडा : ३,२७,७९०

*मालेगाव मध्य : २,९६,०८६

*मालेगाव बाह्य : ३,५४,३७६

*बागलाण : २,८४,८७७

Dhule Lok Sabha Election 2024
Sangli Lok Sabha : ठरलं! सांगलीतून विशाल पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; शिवसेनेसह मविआचं वाढवलं टेन्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com