संघर्षाच्या स्मृतींनी दाटला गहिवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

सोशल मीडियावरही वर्षाव 
फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरवरून गुलाब पाटील यांचे मित्र, नातेवाईक, कंपनीतील कर्मचाऱ्यांनी "सकाळ'चे वृत्त व्हायरल केल्यानंतर पाटील यांच्या संघर्षमय वाटचाल, कार्याला सलाम, ग्रेट, प्रेरणादायी, अशा शब्दांत "लाइक्‍स' मिळाल्या. दिवसभर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.

धुळे - ""जगभरात अनेक जण मोठ्या संघर्षातून यशोशिखर गाठतात, त्यांचे कौतुक होतेच; पण आपल्या यशासाठी त्याग करणाऱ्यांसाठी पुढील जीवनात "कृतज्ञतेचा महायज्ञ' मांडणारे कमीच असतात. आईवडिलांचे अपार कष्ट आणि सात बहिणींनी केलेल्या त्यागाला शाश्‍वत कृतज्ञतेच्या माध्यमातून सातही बहिणींच्या कुटुंबाची, मुला-बाळांची सोय पाहिल्यामुळे राज्यभरातून शुभेच्छांचा पाऊस माझ्यावर दिवसभर पडला. त्यातून मनःपटलावर जुन्या काळातील संघर्षाच्या उमटलेल्या स्मृतींनी दिवस गहिवर दाटत राहिला,'' अशा शब्दांत पुणेस्थित डिजिटल ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रातील लेमा कंपनीचे संस्थापक गुलाब पाटील (मूळ रा. धमाणे, ता. धुळे) यांनी स्वतः "सकाळ'कडे भ्रमणध्वनीवरून आपल्या भावनांना आनंदाश्रूंच्या साक्षीने वाट मोकळी करून दिली. 

कष्टातून घातली स्वप्नभूमीला गवसणी...

गुलाब पाटील यांचे इतरांसमोर आदर्श ठेवणारे यश आणि त्यामागील त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या अपार कष्टाची, त्यागाची प्रेरक कथा "सकाळ'ने मंगळवारच्या (ता. 9) अंकातून राज्यभर पोचविली. त्यानंतर दिवसभर त्यांच्या कार्याला "सॅल्यूट' करणाऱ्या शुभेच्छांचा त्यांच्यावर पाऊस पडत राहिला. 

गुलाब पाटील म्हणतात, "संघर्षातील पूर्वीचे दिवस "सकाळ'मुळे आठवल्याने आज अश्रू अनावर होत आहेत. आई-वडील, सात बहिणींनी माझ्या शिक्षणासाठी केलेले काबाडकष्ट आठवल्याने त्यांच्याविषयी कुठल्या शब्दांत आदर व्यक्त करावा, ते आता सुचत नाही. संघर्षमय वाटचाल राहिल्याने मी लौकिक अर्थाने कुणी तरी मोठा झालो, ते आज "सकाळ'मुळे जाणवले. "गरिबीला नमविता येऊ शकते,' हा संदेश "सकाळ'द्वारे गेल्याने आभार व्यक्त करतो...' 

पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, लातूरसह ठिकठिकाणाहून अनेक व्यक्तींनी पाटील यांच्याशी संपर्क साधला. काहींनी त्यांचा संपर्क क्रमांक मिळविला, तर काहींनी "सकाळ'च्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. सर्वप्रथम पुण्यात त्यांचे वास्तव्य असलेल्या फ्लॅट सिस्टीममधील रहिवाशांनी आपल्या येथेच राहणाऱ्या गुलाब पाटील यांची संघर्षमय, प्रेरक कहाणी "सकाळ'मध्ये पाहिल्यानंतर थेट पाटील यांना दूरध्वनी करत आपल्या भावना विशद केल्या. 

Web Title: dhule news gulab patil story