Unseasonal Rain : शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार; अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Due to unseasonal rain and cloudy weather wheat gram and banana crops in Rabi are likely to be hit hard nandurbar news

Unseasonal Rain : शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार; अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

तळोदा (जि. नंदुरबार ) : तळोदा तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस (unseasonal rain) , तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील गहू, हरभऱ्यासोबतच केळी आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Due to unseasonal rain and cloudy weather wheat gram and banana crops in Rabi are likely to be hit hard nandurbar news)

निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत, उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आता शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत अनेकदा निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागला आहे. यंदादेखील ऐन रब्बीच्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना जोरदार फटका बसला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने व हिवाळ्यात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने, रब्बीत चांगले उत्पन्न घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

तळोदा शहरासह तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसनसह अनेक गावांमध्ये रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाला मोठा फटका बसला आहे. परिपक्व झालेले गहू पीक पावसामुळे सर्वत्र आडवे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्याचबरोबर कापण्यात आलेला हरभरा, तसेच परिपक्व झालेला हरभरा यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यांमुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे खांबही कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. इतर पिकांनादेखील अवकाळीचा चांगलाच फटका बसला आहे.

यादरम्यान गेले काही दिवस वातावरणदेखील ढगाळ होते. त्यामुळे एकंदरीत वातावरणातील बदलामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे काम सुरू असून, अचानक आलेल्या या पावसामुळे बांधकाम करणाऱ्यांचीही भंबेरी उडाली असून, त्यांचे संसार उघड्यावर आल्याचे चित्र आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बीलाही नुकसान सोसावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यानिमित्ताने शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

दुहेरी आर्थिक फटका

वातावरणातील बदलांमुळे रब्बीतील गहू, हरभरा यांच्यावर मर, माव्यासह विविध प्रकारची किडी पडत, पिकांचे नुकसान होत उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आता कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना, दुहेरी आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

"अवकाळी पावसामुळे गव्हाचे पूर्णतः झोपले आहे. त्यामुळे गव्हाची कापणी करून, तो मळणी यंत्राद्वारेच काढावा लागणार आहे. यामुळे गहू काढणीस मोठा खर्च लागणार आहे. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करीत, त्वरित मदत मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत." -मुरलीधर कापसे, शेतकरी, रांझणी