
Agriculture News : Online नोंदणीसाठी 31 पर्यंत मुदतवाढ
Dhule News : रब्बी हंगाम २०२२- २०२३ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीसाठीची २० मे २०२३ पर्यंत मुदत होती.
परंतु, नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता राज्यातील भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची नोंदणी ही अल्प प्रमाणात झाली आहे.
त्यामुळे अभिकर्ता संस्थांनी केलेल्या मागणीनुसार या रब्बी पणन हंगामामध्ये भरडधान्य (मका/ज्वारी) खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension of time till 31st for online registration Bulk grain procurement portal Govt's decision due to low registration of farmers Dhule News)
जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम २०२२- २०२३ मधील ऑनलाइन पिकपेरा नमूद असलेला सातबाऱ्याची मूळप्रत, आधारकार्ड झेरॉक्स, बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी माहितीसह संबंधित तालुक्याच्या सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या ठिकाणी नोंदणी करावी.
जॉइंट खात्याचा वापर फक्त प्रथम खातेदार व्यक्तीनेच करावा. जॉइंट खात्यातील क्रमांक दोन नंबर खातेदाराने नोंदणीसाठी अकाउंट तपशिल दिल्यास पीएफएमएस पोर्टलवरुन रक्कम येणार आहे याची संबंधित खातेदाराने नोंद घ्यावी.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एसएमएसद्वारे सूचना
शेतकऱ्यांना खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे माल घेऊन येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे.
त्या शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणीसाठी लाइव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी भरडधान्याची नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. नोंदणी व खरेदीसाठी आपापल्या तालुक्यातील संबंधित सहकारी खरेदी विक्री संस्थेशी संपर्क साधावा, असेही अधिकाऱ्यांनी कळविले आहे.