Sakal Special News : कापसाला 6 हजार 800 चा निच्चांकी दर; शेतकरी मेटाकुटीला, ६० टक्के कापूस पडून | Low rate of 6 thousand 800 for cotton Cotton prices further down Farmers get 60 percent cotton fall Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton News

Sakal Special News : कापसाला 6 हजार 800 चा निच्चांकी दर; शेतकरी मेटाकुटीला, 60 टक्के कापूस पडून

Jalgaon News : शेतकऱ्यांकडे अद्यापही २०२२च्या खरीप हंगामातील कापूस पडून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नसल्याने दरही नाहीत. तीन दिवसांपूर्वी कापसाला ७२०० ते ७५००चा दर होता.

शनिवारी (ता. २७) त्यात तब्बल पाचशे ते सातशे रूपयांची घसरण होवून, सध्या प्रतिक्विंटल ६ हजार ८००चा दर मिळत आहे. हा दर सर्वात निच्चांकी असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. (Low rate of 6 thousand 800 for cotton Cotton prices further down Farmers get 60 percent cotton fall Jalgaon News)

यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला प्रतिक्विंटल दहा ते १३ हजारांचा दर कापसाला मिळालेला नाही. खरीप हंगामातील ५५ ते ६० टक्के कापूस अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून आहे. सावकारांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजावर व्याजात रोज वाढ होत असताना कापसाला मात्र दहा हजारांचा दर मिळत नाही अन्‌ त्यामुळे शेतकरी कापूस विकत नाही.

परिणामी, कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर चढवित असल्याचे विदारक चित्र आहे. पांढरे सोने म्हणून प्रख्यात असलेला कापसाकडे शेतकरी नगदी पिक म्हणून पाहतात. यामुळेच खरीप हंगामात कापसाचा सर्वाधिक पेरा होतो. यंदा कापसाचा ११० टक्के पेरा झाला होता.

मागील वर्षी (२०२१) टंचाईमुळे कापसाला १३ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही कापसाला मागणी राहील, दर किमान दहा हजार रुपये मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस पेरला. मात्र, अतिवृष्टी झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हंगाम येताना काही ठिकाणी कापसाला १५ हजार, १३ हजार व अकरा हजारांचा दर व्यापाऱ्यांनी दिला. नंतर मात्र चांगला हंगाम हातात आला अन्‌ भाव आठ ते साडेआठ हजारांदरम्यान राहिले. दिवाळीत शेतकऱ्यांनी याच दरात काही प्रमाणात कापूस विकला.

मात्र, किमान दहा हजारांचा दर मिळेल या आशेने कापूस घरात साठविण्यात आला. सध्याही ५५ ते ६० टक्के कापूस शेतकऱ्यांचा घरात पडून आहे.

गेल्या आठवड्यात कापसाला ७ हजार २०० ते ७ हजार ५०० चा दर होता. आज अचानक कापसाला ६ हजार ८०० दर मिळाला. हा दर निच्चांकी असल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

दर कमी होण्याची कारणे

आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला मागणी कमी आहे. सोबतच खंडीचे दर ५५ हजारापर्यंत आहेत, जे ७० हजारापर्यंत होते. सरकीचे दरही ३२०० वरून २६००पर्यंत खाली आले. कापसाच्या खंडीला ग्राहक नाहीत.

मागणीच नसल्याने जिनर्स गाठी तयार करून कोणाला विकणार? असा प्रश्‍न आहे. यामुळे कापसाला आज ६८०० दर मिळाल्याने शेतकरी निराशेच्या गर्गेत आहे. त्याचप्रमाणे बाजारात कापूस नसल्याने जिनिंग मिल्स सुरू राहू शकत नाहीत.

सध्या ज्या जिनिंग सुरू आहेत, त्या एका पाळीत सुरू आहेत. एखाद्या जिनमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे.

* दरवर्षी होणारे कापसाच्या गाठींचे उत्पादन : १८ ते २५ लाख

* गतवर्षी उत्पादित गाठी : नऊ लाख

* खंडीला मिळालेला दर : ५५ हजार

* शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर : नऊ ते १३ हजार

* यंदा झालेले गाठींचे उत्पादन : सुमारे ८ लाख

* यंदाचा सध्याचा दर : ६८००

"कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नाही. खंडीचे दर पंधरा हजारांनी कमी झाले आहेत. सरकीचे दरही कमी झाले. एकत्रीत कापसाच्या चांगल्या दराला पुरक वातावरण नसल्याने कापसाचे दर कमी झाले आहेत."

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग, प्रेसिंग असोसिएशन