डोंगराच्या कडाकपारीला नारळाने ठोकून का घेता दर्शन ? वाचा सविस्तर ! 

डोंगराच्या कडाकपारीला नारळाने ठोकून का घेता दर्शन ? वाचा सविस्तर ! 

वार्सा : पिंपळनेर च्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी कोकणी , मावची व भिल्ल समाजात पारंपारीक पध्दतीने डोंगऱ्यादेवाचा उत्सव साजरा करण्यात येतो. या डोंग-यादेव उत्सवाची सुरूवात नागपंचमी पासूूून झाली. या उत्सवातून या जुन्या रूढी ,परंपरांची जतन म्हणून व संपूर्ण गाव एकञ येत व एक मेकातील गैरसमज दूर होतो. समाजातील अखंडता या डोंगऱ्यादेवाच्या उत्सवामुळे टिकून आहे.

आदिवासी कोकणी, कोकणा तसेच भिल्ल, मावची समाजाच्या गावात हा डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम सुरु असताना. गावातील लोकांचे नवसपूर्ती झालेल्या कुटूंबातील घरधनी(घरमालक/मुख्यव्यक्ती) डोंगऱ्यादेव पूजाविधी मांडतात. या कार्यक्रमात गाव मंडळीसह शेवऱ्यामाऊली तसेच शितमाऊलीच्या साहाय्याने देवखळीत पावरीच्या मधुर सुरांवर पायांचा ठेका धरून हाताने टाळ्यांच्या गजरासह निसर्गदेवतेची गौरवगाथा, गाणी/वळती गायीली जातात. दिवाळीच्या चंद्रदर्शनानंतर आदिवासी गावात डोंगऱ्या देवाच्या कार्यक्रमामुळे गावागावात हर्षउल्हासाचे वातावरण बहरलेले असते.

डोंगऱ्या देव म्हणजे कोणता देव ?

कार्तिकस्वामी म्हणजेच डोंगऱ्या देव म्हणजे कोणता देव ? असा अनेकांना प्रश्न पडतो. परंतू कार्तिकस्वामी म्हणजेच डोंगऱ्या देव आहे. आदिवासी बांधव डोंगऱ्या हा उत्सव अगदी मिळून मिसळून साजरा करतात.

केव्हा साजरा होतो हा उत्सव

आदिवासी भागात डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम कार्तिक किंवा मार्गशीर्ष (नोव्हेंबर आणि डिसेंबर) महिन्यात चंद्रदर्शनानंतर निसर्गदेवता डोंगऱ्यादेवाला बोललेले नवस फेडण्यासाठी नवसपूर्ती किंवा डोंगऱ्यादेवाच्या कृपेने वैभव प्राप्त झालेले कुटुंब डोंगऱ्यादेवाची पूजा शेवऱ्यामाऊली (पुजारी) च्या मंत्रोच्चाराने भोपामाऊली(देवाचा सेवक)डवरीमाऊली(पावरकर)व गावकरी मंडळींच्या साक्षीने मांडत असतात. घरधनी माऊली आपल्या घराचे अंगण गोमूत्र व शेणाने सारवतात. त्या देवखळीवर(अंगणात) दररोज रात्री माऊल्या डोंगऱ्यादेवाच्या वळत्यां(गाण्यां) मध्ये विविध आदिवासी देवतांचे वर्णन, गौरव गात फेर धरून एका ताला सुरात नाचत असतात. वळतीची प्रत्येक ओळ बदलली की नाचाचा प्रकारसुद्धा बदलत असतो.

एकमेकांना शितमाऊली म्हणून केला जातो नमस्कार

अशाप्रकारे रोजच घरधनी माऊलीमुळे गावात आनंदाला उधाण आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक माऊली घरधनी माऊलीची देवखळी जागविण्याचा प्रयत्न करीत असते. या उत्सवाच्या काळात देवखळीवर येणारी पुरुष मंडळी एकमेकांना भेटल्यावर "शितमाऊली" असे म्हणून देवाला स्मरुन एकमेकांना नमस्कार करतात. देवाच्या जागरणाचा कार्यक्रम साधारणतः चंन्द्रदर्शन ते पौर्णिमेपर्यंत सुरु असतो. यात प्रमुख्याने 14 व्या दिवशी गडावर जाऊन देवाची पुजा मांडली जाते. या दिवशी रात्री सर्व माऊल्या निसर्गच्या सानिध्यात राहून निसर्गदेवता डोंगऱ्यादेवाचा जागरण करीत असतात. याच रात्री पौर्णिमेच्या संपूर्ण चंद्राचे शीतल किरण अंगावर घेत देवाच्या वळत्या गात डोंगऱ्यादेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व माऊल्या नाचण्यात दंग झालेले असतात.

निर्सगाने साथ देण्याची होती प्रार्थना

पौर्णिमेला सुरूवात झाल्यावर डोंगरच्या कडा-कपारीत देवाची पुजा मांडून दिवा लावून या निसर्गदेवतेला आव्हाहन करून निसर्गाने आम्हाला साथ द्यवी. या जीवसृष्टीतील चिडी-मुंगी, पशु-पक्षी व मानवलोकांचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून शेवऱ्या माऊली प्रार्थना करीत असते.

कडकपारीला नारळ ठोकून दर्शन

पहाटेला सर्व माऊल्या गडाला(कडकपारीच्या डोंगरदेवाला/डोंगऱ्यादेवाला) जाऊन कडाकपारीला नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी एकप्रकारे साद(साकड) घालीत असतात. त्यानंतर सर्व माऊल्या घरधनीच्या घरी परतात. त्यांच्या स्वागतासाठी गावातील वरिष्ठ मंडळीसह महिला व अबालवृद्ध वाट पहात असतात. माऊल्या घरी आल्यानंतर देवाला कोंबडा, बोकडाचा मान दिला जातो.व संध्याकाळी गावजेवणाचा भंडारा केला जातो. 

या गडांवर साजरा होतो डोंगऱ्या उत्सव

आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगऱ्या देव उत्सवातील विविध गड (बार ) पुंजले जातात ह्या गडांची नावे पुढीलप्रमाणे :
कंसऱ्या गड -शबरीधाम डांग जिल्हा गुजरात. शेंदवड गड -शेंदवड ता.साक्री जि.धुळे. कोल्याटा गड -बर्डीपाडा ता.साक्री जि.धुळे. धाऱ्याबाऱ्या गड -बासर ता.साक्री जि.धुळे. झळका गड-झळके ता.नंदुरबार. बगळ्या गड-जामखेल ता.साक्री जि.धुळे. असलपेढा -टेंभा बागुलपाडा ता.साक्री जि.धुळे. निवळी/निवळा -करझंटी ता.साक्री जि.धुळे. मांडवगड नवापाडा ता.साक्री जि.धुळे. आजीपाळगड वडपाडा ता.साक्री जि.धुळे चिचल्यागड बंधारपाडा ता.नंदुरबार जि.नंदुरबार. भिवसनगड मावजीपाडा ता.साक्री जि.धुळे. मोगरा गड पाचमौली ता.साक्री जि.धुळे. शेवगागड पचाळे ता.साक्री जि.धुळे. पातळ गड वाल्हवे ता.साक्री जि.धुळे. नारळ गड पांगण ता.साक्री जि.धुळे .भुयर गड विरखेल ता.साक्री जि.धुळे. खारकी गड विरखेल ता.साक्री जि.धुळे. धनाई पुनाई झिरणीपाडा ता.साक्री जि.धुळे. कुवर्ली गड शिरपूर जि.धुळे, झळकागड झळका निंबी ता.नंदुरबार जि.नंदुरबार. बगला गड ढेकवद ता.नंदुरबार जि.नंदुरबार. धवळबारी गड शिर्वे ता.नंदुरबार जि.नंदुरबार.पावा गड मानुर पेठ नाशिक जि.नाशिक. धवळ्या गड मांगी तुंगी ता.सटाणा जि.नाशिक. तवली डोंगर गड सुरगाणा रोड ता.सुरगाणा जि.नाशिक.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com