आमदार, नेते अन्‌ मतदारांनाही निवडणुकांच्या "20-20'चे वेध 

party-flag.jpg
party-flag.jpg

नाशिक : आगामी वर्षात जिल्हा बॅंक, कादवा कारखाना, पिंपळगाव बसवंत बाजार समिती अन्‌ तीनशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात राज्यात "मिले सुर मेरा, तुम्हारा' गीत गाणाऱ्या महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, आमदारांना आघाडीतील प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करावे लागतील. राजकीय अस्तित्वासाठीची ही निकराची लढाई आहे. त्यात स्वतःचीच हार-जीत पाहावी लागेल. जिल्ह्याच्या गावागावांतील ग्रामीण-राजकीय अर्थकारणावरील वर्चस्व ठरेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्चस्वाची अन्‌ शिवसेनेच्या अस्तित्वाची रंगतदार लढत मतदारांना "श्रीमंत' करणारी ठरेल. 

आपले गावातील अस्तित्व काय? हे ठरवणाऱ्या निवडणुका

सहकाराचा प्रभाव, परिणाम थेट शेतकरी, गावगाड्यावर होतो. मात्र, त्याचे निकाल ठरविण्याचा अधिकार मोजक्‍या प्रतिनिधिक नेते, मतदार प्रतिनिधींच्या हाती असतो. या निवडणुकांचे पडघम वाजवत 2020 या नव्या वर्षाचे आगमन झाले आहे. त्यामुळे गावोगावी नव्या सरकारचे मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक लावणारे कार्यकर्ते, नेत्यांचे आपले गावातील अस्तित्व काय? हे ठरवणाऱ्या निवडणुका होणार आहेत. त्यात त्यांनी आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा हातात हात घेतला आहे. हा हात झटकून स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे. यामध्ये अस्तित्वासाठी हे सगळे आमनेसामने लढतील. त्यात महाविकास आघाडी, त्यांचे नेते या सगळ्यांचेच झेंडे गळून पडतील. यामध्ये एक-एक मत "लाखमोलाचे' असते. विशेषतः जिल्हा बॅंक, बाजार समितीच्या मतदारांचे तर कॅम्प केले जातात. त्यामुळे जिल्हा बॅंकेसाठी सोयीचे ठराव करण्यासाठी आमदार, खासदार, संचालक स्वतः गावपातळीवर लक्ष घालत आहेत. ज्यांचे मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव होतील त्यांना येणारे 2020 हे वर्ष "श्रीमंत' करून जाणार आहे. 

दिलीप बनकर, श्रीराम शेटेंच्या अस्तित्वाचे; आमदारांच्या परीक्षेचे अन्‌ मतदारांच्या बरकतीचे वर्ष 

दिंडोरी, पेठ व चांदवड या तीन तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कादवा कारखान्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते श्रीराम शेटे यांचे वर्चस्व आहे. यंदा त्यांना रोखण्यासाठी मतदारसंघातील त्यांचे शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज सगळे एकत्र येतील. त्यात आमदार नरहरी झिरवाळ शेटेंना मदत करतील. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेतेच आपसांत लढतील. अशीच स्थिती निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आहे. तेथे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांची सत्ता आहे. बनकर विरुद्ध माजी आमदार अनिल कदम अशी सरळ लढत आहे. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटींची आहे. मतदारसंघातील ते मोठे सत्ता व शेतकऱ्यांच्या संपर्काचे केंद्र आहे. त्यामुळे बनकर आणि कदम दोघे अंगात हत्तीचे बळ आणून लढतील. अशीच स्थिती ओझर ग्रामपंचायतीत अनिल कदमविरुद्ध यतीन कदम यांच्या राजकीय भाऊबंदकीची असेल. या दोन्ही निवडणुका अनिल कदम यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 

येत्या वर्षात जवळपास 300 ग्रामपंचायतींच्या निवडणुका

देवळाली, देवळा, येवला व्यापारी बॅंक, सिन्नर, येवला, देवळा, उमराणे या बाजार समित्या, ओझर, लासलगाव (निफाड), निमगाव (मालेगाव), दळवट (कळवण), देवळा नगरपंचायत, अंदरसूल (येवला) यांसह 300 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या वर्षात होतील. राज्यात सत्तांतर झाल्याने गावागावांतील गट-तट, तरुणांचे नेतृत्व व राजकीय हवा पालटत आहे. त्याचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. त्यात स्थानिक स्तरावरच बिनसले तर, महाविकास आघाडीचा कौल किती दिवस टिकेल, याचे भाकीत या निकालांतून मिळेल. त्यामुळे यंदाचे वर्ष सर्वच विद्यमान आमदारांची परीक्षा घेणारे, सहकारातील मतदारांना श्रीमंत करणारे ठरेल. 

अशा होतील लढती... 
कादवा : श्रीराम शेटेविरुद्ध शिवसेना, कॉंग्रेस 
पिंपळगाव बाजार समिती : आमदार दिलीप बनकरविरुद्ध अनिल कदम 
ओझर ग्रामपंचायत : अनिल कदमविरुद्ध यतीन कदम 
जिल्हा बॅंक : देवीदास पिंगळेविरुद्ध शिवाजी चुंभळे 
लासलगाव ग्रामपंचायत : कल्याणराव पाटीलविरुद्ध जयदत्त होळकर 
दळवट ग्रामपंचायत : आमदार नितीन पवारविरुद्ध स्थानिक 
देवळा नगरपंचायत : आमदार आहेरविरुद्ध शांतारामतात्या आहेर 

होमपीचवर राजकीय ट्‌वेंटी-20 
ओझर, वणी, मोहाडी, दळवट, लासलगाव, निमगाव या थेट आमदारांच्या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत. याशिवाय खेडलेझुंगे, नांदूरमध्यमेश्‍वर, देवगाव (निफाड), बाणगाव, टाकळी खुर्द, पळाशी, खादगाव, जामदरी (नांदगाव), निमगाव, रावळगाव, झोडगे, सौंदाणे, कळवाडी, अजंग, वडेल, वडनेर (मालेगाव), लोहोणेर, निंबोळा, खालप (देवळा) करंजाळी, कोहोर, जोगमोडी (पेठ), येवल्यातील अंदरसूल, पाटोदा, नगरसूल, बोकटे, राजापूर यांसह जिल्ह्यातील 300 लहान-मोठ्या ग्रामपंचायत निवडणुका होतील. त्यात अनेक गावांत थेट विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका म्हणजे आमदारांची प्रतिष्ठा ठरवणाऱ्या अन्‌ त्यांच्या विरोधकांचा राजकीय हिशेब चुकता करणाऱ्या ट्‌वेंटी- 20 सामने असतील. 

हेही वाचा > सभापतिपदाच्या सत्तानाट्यात भुजबळांनी तारले आघाडीला! 

कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचे काय होणार? 
देवळाली कॅन्टोन्मेंट आणि देवळा नगरपंचायत या भाजपसाठी प्रतिष्ठेच्या निवडणुका आहेत. शिवसेनेशी नाते तोडल्यामुळे गावपातळीवरच्या या निवडणुकीत शिवसेनेला दोन्ही कॉंग्रेससोबत मनोमिलनाची संधी आहे. ते सर्वच एकत्र आले, तर भाजपची अडचण होऊ शकते. या संस्थेत भाजपचे सदस्य असलेले जवळजवळ सर्वच केवळ राज्य, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी अन्य पक्षांतून आले आहेत. ही मंडळी वाऱ्याची दिशा पाहून तोंड फिरवत स्वगृही जातात की भाजपसोबत राहतात, यावर जिल्ह्यातील भाजपची प्रतिष्ठा ठरेल. एकूणच भाजपसाठी ही मोठी परीक्षा असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com