हेमा गोटे यांचा नगरसेविकापदाचा राजीनामा

Hema Gote resigns as corporator
Hema Gote resigns as corporator

धुळे ः लोकसंग्राम पक्षाच्या एकमेव नगरसेविका हेमा गोटे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा दिला. श्रीमती गोटे यांचा राजीनामा प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल असे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारभाराचा वीट आला आहे, नागरिकांच्या समस्या सुटत नसतील तर उपयोग काय अशी प्रतिक्रिया श्रीमती गोटे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

महापालिकेच्या डिसेंबर-2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक-5 (ब) मधून श्रीमती गोटे निवडून आल्या होत्या. त्यांच्या रूपाने महापालिकेत लोकसंग्रामचा एकमेव नगरसेवक होता. दरम्यान, निवडून आल्यानंतर आता वर्षभराच्या कालावधीनंतर त्यांनी आज आपला नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सादर केला.

आपल्या दोन ओळींच्या राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे नगरसेवकपदाचा राजीनामा देत असून तो मंजूर करावा ही विनंती असे म्हटले आहे. दरम्यान, या राजीनाम्यामागे महापालिकेच्या कारभाराविषयी त्यांना संताप असल्याचे दिसून आले.

नको वाटतो असा कारभार
महापालिकेचा सध्याचा कारभार नकोसा वाटतो. नागरिकांना 20-20 दिवस पाणी मिळत नाही, शहरात रस्त्यांची दुरवस्था आहे, स्वच्छतेचा बोजवारा आहे. महापालिका नागरिकांना पाणी देऊ शकत नसेल तर उपयोग काय. कारभारात सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, त्यासाठी वर्षभर वाट पाहिली पण सुधारणा होत नसल्याने आता नगरसेवक म्हणून काम करणे नकोसे वाटते. नगराध्यक्ष म्हणून मी 13 महिने काम केले आहे. त्यावेळी शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी दिले, ऐंशी फुटी रस्त्यासारखी कामे केली.

तत्कालीन नगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईची असताना चांगली कामे केली व शेवटी 11 कोटी रुपये शिल्लक ठेवले होते. आता तर 300 कोटी, 500 कोटीच्या गप्पा होतात, एवढ्या पैशातून शहरात लखलखाट व्हायला हवा होता असा टोलाही श्रीमती गोटे यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.

गैरहजेरीचा विषय
नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर श्रीमती गोटे महापालिकेच्या एकाही महासभेला हजर राहिलेल्या नव्हत्या. त्यांनी वेळोवेळी रजेचे अर्ज मात्र सादर केले होते. दरम्यान, भाजपचे स्वीकृत नगरसेवक हिरामण गवळी हे वारंवार श्रीमती गोटे यांच्या महासभेतील गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करून निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होते. या विषयावर नगरसचिव विभागाने महापौरांकडे अहवालही सादर केला होता.


प्रभाग क्रमांक-5 (ब) च्या नगरसेविका हेमा गोटे यांचा राजीनामा प्राप्त झाला आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून जशा सूचना प्राप्त होतील, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
-अजीज शेख, आयुक्त, महापालिका धुळे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com