शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

खोलीतून पाण्याच्या वाफा बाहेर येत होत्या. त्यांनी दारावरील खिडकीचा कप्पा उघडून पाहिला असता, प्रवीण देवरे हे निपचित पडलेले असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना दिली असता, पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रवीण देवरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले

नाशिक : अशोकस्तंभ येथे कॉटबेसिकने राहणाऱ्या खोलीत पाण्याच्या बादलीत टाकलेल्या इलेक्‍ट्रिकल कॉईलचा झटका बसून शिक्षकाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रवीण देवरे असे नाव असून ते जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक होते. सदरची घटना गुरुवारी (ता.19) सकाळी घडली असून साडेदहा-अकरा वाजेच्या सुमारास उजेडात आली. 

अशी घडली घटना...

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण नामदेव देवरे (38, सध्या, रा. रॉकेल गल्ली, अशोकस्तंभ, नाशिक. मूळ रा. उमराणे, देवळा) असे शिक्षकाचे नाव आहे. प्रवीण देवरे हे जानोरी (ता. दिंडोरी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात शिक्षक होते. ते रॉकेल गल्लीतील घर क्रमांक 489 याठिकाणी भाड्याने खोली करून राहत होते. त्यांच्यासमवेत आणखीही काही महाविद्यालयीन युवक राहत होते. प्रवीण देवरे यांना आज सकाळी शाळेवर लवकरच जायचे होते. तरी त्यांच्याआधी खोलीतील त्यांचे सहकारी आवरून बाहेर पडले तर, देवरे यांनी अंघोळीसाठी पाणी गरम करण्याचे असल्याने त्यांनी इलेक्‍ट्रिकल कॉईल बादली टाकली होती. पाणी गरम झाले की नाही हे पाण्यासाठी त्यांनी पाण्यात हात घातला असावा आणि त्याचवेळी त्यांना इलेक्‍ट्रिकल शॉक बसला. यातच त्यांचा मृत्यु झाला. 

जरूर वाचा-त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ-भुजबळ

आणि मृत्युमुखी पडले

सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास त्या खोलीत राहणारे काही जण आले. खोलीतून पाण्याच्या वाफा बाहेर येत होत्या. त्यांनी दारावरील खिडकीचा कप्पा उघडून पाहिला असता, प्रवीण देवरे हे निपचित पडलेले असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना दिली असता, पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रवीण देवरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा > हळदीत नाचताना फक्त धक्का लागला..अन् थेट हल्लाच..थरार...

दोन महिन्यांपूर्वीच नोकरीत कायम 
प्रवीण देवरे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये 17 फेब्रुवारी 2014 रोजी रूजू झाले होते. रूजू झाल्यापासून ते जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालय या शाखेत होते. जानोरी विद्यालयात गणित व विज्ञान हे विषय शिकवित होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ते संस्थेमध्ये शिक्षक म्हणून परमनंट (कायमस्वरुपी) नियुक्त झाले होते. मात्र त्यांच्या अकस्मात निधनामुळे जानोरी गावात व विद्यार्थ्यांना एकच धक्का बसला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hitter shock teacher died Nashik marathi news