आजाराशी झुंज देतानाही इरफान खानने जपली सामाजिक बांधिलकी

विजय पगारे
शुक्रवार, 13 जुलै 2018

इगतपुरी : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता इरफान खानला गेल्या काही दिवसांपासुन अत्यंत दुर्मिळ अशा मेंदुच्या कर्करोगाने ग्रासले आहे. सध्या त्याच्यावर इंग्लंडमध्ये वैद्यकिय उपचार सुरु असुन कर्करोगाशी दोन हात सुरु आहेत. मी आता माझ्या आजारामुळे पुर्णतः खचलो आहे अशी भावना त्याने ट्विटरवरसुध्दा व्यक्त केली आहे. मात्र एवढ्या यातना असुनसुद्धा आपल्यातील माणुसकी मोठ्या मनाने सांभाळत असल्याचा प्रत्यय इरफान खानने दत्तक घेतलेल्या इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम व शंभर टक्के आदिवासी असलेल्या पत्र्याचीवाडी या गावात व शाळेत आज आला. 

गेल्या दोन वर्षापासुन इरफान खान व या गावातील लोकांचा संपर्क आला. येथील निसर्गरम्य व आल्हाददायक वातावरणाची भुरळ पडल्यामुळे इरफान खानने या भागात फार्म हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षापासुन त्रिंगलवाडी किल्ला व धरण परिसरात त्याच्या फार्महाउसचे बांधकामही सुरु झाले. त्यामुळे नेहमी येणे जाणे वाढल्याने पत्र्याचीवाडी गाव व शाळा दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासुन येथील आदीवासी बांधवांना व शाळेतील मुलांना इरफान खानच्या सानिध्य फाउंडेशनच्या माध्यमातुन मिळालेल्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला होता. 

इरफान खानला कर्करोगाचा आजार झाल्याची वार्ता या आदीवासी वाडीत पोहचल्यावर बाया बापड्यांनी दु:ख व्यक्त करीत अनेक आठवणींना साहित्य वितरणाप्रसंगी उपस्थित असलेल्या त्याच्या भाच्याजवळ उजाळा दिला. यामुळे इरफान खानचा भाच्यालाही भावना अनावर होत गहिवरून आले. 

दुर्मिळ अशा आजाराशी सामना सुरु असला तरी इरफान खानने इंग्लंडमधुन संपर्क साधत पत्र्याचीवाडी येथील शाळेतील 96 मुलामुलींसाठी त्याच्या भाच्यामार्फत थेट वाडीत रेनकोट, दप्तर, वह्या, पेन व शालोपयोगी साहित्यासह मुलांसाठी गोड खाऊ व गावातील  लोकांसाठी पावसाळ्याच्या दृष्टीने सुरक्षीततेचे साहित्य पाठवून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. यातुन इरफान खानने संत तुकाराम महाराजांचे संतवचन जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा ,देव तेथेचि जाणावा याचा खरोखर प्रत्यय दिला आहे. 

आज पत्र्याचीवाडी येथील प्राथमिक शाळेत इरफान खानचा भाचा याच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंदारे, विस्तार अधिकारी कैलास सांगळे, मुख्याध्यापक सचिन कापडणीस, भाऊराव बांगर, राजेंद्र पवार, उत्तम भवारी, गोरखनाथ परदेशी, दिपमाला तोरवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

विद्यार्थी पाठवणार शुभेच्छापत्र -
इरफान खान यांच्या तब्येतीबद्दल मुलांना समजल्यावर सर्व दुःखी व अस्वस्थ झाले. सर्व मुलांनी एकत्रित येऊन तब्येत चांगली होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली व सर्व मुलांच्या वतीने एक भावनिक शुभेच्छापर लिखीत स्वरुपात पत्र पाठविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे निश्चित साहेबांना आजार दूर होण्यासाठी आमच्या चिमुकल्या आदिवासी मुलांच्या सद्भावनांचे बळ मिळेल.
- दिलीप भाऊ दोरे ,विद्यार्थी, इयत्ता पाचवी ,पत्र्याचीवाडी 

Web Title: irfan khan helps tribal while fighting with cancer