पक्ष बळकटीसाठी शिरीष चौधरी मंत्रिमंडळात? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

कॉंग्रेस बळकटी देण्यासाठी एकमेव असलेले आमदार शिरीष चौधरी यांना मंत्रिपद मिळणार काय? याकडेच आता जिल्हावासियांचे लक्ष आहे. 

जळगाव : जळगाव जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिला असताना तब्बल तीन मंत्रिपदे या जिल्ह्यात होती. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वाट्याला मंत्रिपद आलेच नाही. आजच्या स्थितीत कमकुवत झालेल्या कॉंग्रेस बळकटी देण्यासाठी एकमेव असलेले आमदार शिरीष चौधरी यांना मंत्रिपद मिळणार काय? याकडेच आता जिल्हावासियांचे लक्ष आहे. 
स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे कॉंग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात कॉंग्रेसची नाळ घट्ट जुळली. जिल्ह्याने कॉंग्रेसला चांगली साथ दिली. त्यामुळे कॉंग्रेसच्या सत्ताकाळात जिल्ह्यात पक्षाचे तीन-तीन मंत्री होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (कै.) मधुकरराव चौधरी, (कै.) के. एम. पाटील, (कै.) डी. डी. चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या सत्तेच्या काळात मंत्रिपद भूषविले आहे. 

कॉंग्रेस होती मजबूत 
त्याकाळी जळगाव व एरंडोल मतदारसंघात खासदारही कॉंग्रेसचे होते. तर जिल्हा परिषदेवर सत्ता तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्थाही कॉंग्रेसच्या ताब्यात होत्या. त्यावेळी जिल्ह्यात कॉंग्रेससमोर विरोधकच प्रबळ नव्हता. मात्र, सत्तेच्या काळात पक्षांतर्गत वाद अधिकच वाढत गेले. त्यामुळे पक्ष कमकुवत झाला. पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सत्ता गेली, सहकार क्षेत्र तर हातातून कधी गेले हे कळलेच नाही. दोन्ही लोकसभा गेल्या, तर जिल्ह्यात आमदारांची संख्या घटत गेली. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व संपण्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत होते. 

हेही पहा > थोरात, जयंत पाटलांनी केलेला उल्लेख ही माझ्या कामाची पावती : खडसे 

नेतृत्वाचे दुर्लक्ष 
सत्तेच्या काळात पक्षाच्या नेतृत्वाने जिल्ह्यात पक्षांच्या अंतर्गत वादाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे पुढे पक्षाची स्थिती दयनीय झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर जळगाव मतदारसंघ पक्षाकडे असताना पक्ष उमेदवारीचा दावाही करू शकले नाही ही परिस्थिती त्यांच्यावर आली. रावेर येथील एकमेव जागा पक्षातर्फे लढविण्यात आली. या एकमेव जागेच्या विजयासाठी कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी फारसा जोर लावल्याचे दिसून आले नाही. शिरीष चौधरी यांनी आपल्या बळावर खिंड लढविली आणि ते विजयी झाले. 

हे वाचा > शिक्षकांचे असेही दातृत्व 

पुन्हा एकदा संजीवनी 
शिरीष चौधरी यांच्या विजयामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळाली. जिल्ह्यात कॉंग्रेसचे अस्तित्व असल्याचेही दिसून आले आणि कार्यकर्त्यांतही उत्साह दिसून आला. मात्र, आता हाच उत्साह कॉंग्रेसला मजबूत करण्यात होण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते लक्ष देणार काय? हाच प्रश्‍न आहे. जळगाव जिल्हा कॉंग्रेसला पंधरा वर्षाच्या सत्तेच्या काळात मंत्रिपद मिळाले नाही. आज महाविकास आघाडीत कॉंग्रेस सत्तेची वाटेकरी आहे. अशा स्थितीत जळगाव जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी मंत्रिपद मिळण्याची कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार काय? या प्रतीक्षेत कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon district congress shirish choudhari minishter