खडसेंचा वेगळा विचार : शिवसेना, कॉंग्रेस की राष्ट्रवादी? 

कैलास शिंदे
Monday, 9 December 2019

खडसे यांनी पक्षांतर करणार नाही, असे आजपर्यंत ठामपणे सांगितले आहे. परंतु, काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही डावलले गेल्यानंतर मात्र त्यांनी "पक्ष आपल्यावर वारंवार अन्याय करीत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल', असा इशाराच दिला आहे. 

जळगाव : भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल... असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी तसा वेगळा विचार केलाच, तर शिवसेना, कॉंग्रेस की राष्ट्रवादी, कोणत्या पर्यायाला त्यांची पसंती असेल याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजप विरोधी चेहरा, अभ्यासू वक्तृत्व, आक्रमक नेतृत्वाचा फायदा ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाला होणार आहे. 

खडसेंचा इशारा 
खडसे यांनी पक्षाला इशारा दिला असला, तरी पक्षातील नेत्यांत त्याबाबत फारसा विचार केला जाईल, असे सध्या तरी दिसत नाही. राज्यात पक्षाची सत्ता असताना गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जाण्यास अक्षरशः भाग पाडण्यात आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्यापर्यंत नेतृत्वाने त्यांना बाजूला ठेवले. त्यामुळे खडसे स्वतःहूनच पक्षातून जावे, असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत असावे अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नेते त्यांना पक्षांतरापासून रोखण्याचे प्रयत्न करतील, असेही वाटत नाही. पंकजा मुंडे यांनी केवळ एक ट्‌वीट केले, तर पक्षाचे नेते खडबडून जागे झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन त्या कुठेही जाणार नाहीत, असे जाहीर करावे लागले. परंतु, खडसे यांच्या इशाऱ्यानंतरही पक्षाचे नेते फारसे गांभीर्य दाखवत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे खडसे वेगळा विचार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोचल्याचे दिसत आहे. 

संबंधीत बातम्या > तर मला वेगळा विचार करावा लागेल : खडसे 

कॉंग्रेसचाही पर्याय 
एकनाथराव खडसे यांनी वेगळा विचार केल्यास त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी, किंवा कॉंग्रेस असे पर्याय आहेत. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे त्याचा पर्याय होऊ शकतो. भाजपचे माजी खासदार व विद्यमान विधानसभा सभापती नाना पटोले यांनी भाजप सोडल्यानंतर कॉंग्रेसचा मार्ग पत्करला. पक्षानेही त्यांना लोकसभेत पराभूत झाल्यानंतर विधानसभेत उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. भाजपचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना विधानसभेचे सभापतिपदही देण्यात आले. त्यामुळे नानांप्रमाणे भाजपचा कट्टर विरोधक म्हणून कॉंग्रेसला खडसेंचा फायदा होऊ शकतो. मात्र, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. 

हे नक्‍की वाचा > जावळेंचा पराभव कोणामुळे यावरही बोला...समर्थकाची पोस्ट 

"जय महाराष्ट्र'चे गमक काय? 
खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असे सांगत असतानाच शेवटी "जय महाराष्ट्र' म्हटले. त्यामुळे शिवसेनेचा पर्याय ते स्वीकारतील, असे वाटत आहे. खडसे आक्रमक नेते आहेत, शिवसेनेचा आक्रमकता हाच मूळ आत्मा आहे. राज्यात भाजपला टक्कर देवून किंबहुना विरोधी नेत्यांना थेट अंगावर घेऊन त्यांना मुद्येसूद उत्तरे देण्यात खडसे वाकबगार आहेत. विरोधी पक्षनेते असताना त्याही ही चुणूक अनेक वेळा दाखविली आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पक्ष वाढीसाठी शिवसेनेला त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याबाबत शिवसेना आणि स्वतः तेही सकारात्मक असण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादीकडून होती ऑफर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्याय खडसे यांना निवडणुकीतच होता, असे सांगण्यात येत आहे. त्यांना पक्षातर्फे उमेदवारीचा "एबी' फार्मही पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी खडसे यांनी फारशी उत्सुकता दाखविली नव्हती. तरीही खडसे यांचे पक्षबांधणीचे कौशल्य, आक्रमकपणा आणि त्यांना मानणारे कार्यकर्ते याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जळगाव जिल्ह्यासह राज्यातही होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्वही त्याबाबत सकारात्मक असेल. विशेष म्हणजे राज्यात विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त आहेत. त्यात सत्तेतील तीनही पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या पाहता. विधान परिषदेच्या बारा जागांत या पक्षांचा अधिक वाटा असणार आहे. त्यामुळे त्यांनी तीन पक्षांपैकी कोणताही पर्याय स्वीकारल्यास त्यांना विधान परिषदेसह मंत्रिपदाचीही संधी मिळू शकते. मात्र सद्यःस्थितीत तरी ते वेगळा विचार करणार नाहीत. पण, नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ते मोठा निर्णय घेऊ शकतात, असेही संकेत मिळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon eknathrao khadse sena congress ncp