जावळेंचा पराभव कोणामुळे यावरही बोला...समर्थकाची पोस्ट 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

जावळे यांना मंत्रिपदाची संधी मिळू नये, म्हणून पक्षातून त्यांचा पराभव होण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि कॉंग्रेस उमेदवाराला रसद पुरवली गेली. श्री. जावळे हे ही बहुजन समाजाचे नेते होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

रावेर ः रावेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार, माजी आमदार आणि राज्याच्या कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या पराभवावर पक्षात चर्चा का होत नाही? अशा आशयाची पोस्ट श्री. जावळे यांचे कट्टर समर्थक डॉ. आर. एम. चौधरी यांनी आज सोशल मीडियावर फॉरवर्ड केली आहे. यामुळे भारतीय जनता पक्षातील एका नव्या विषयाला तोंड फुटले आहे. 

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसे आणि बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवावर पक्षात आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा होत आहे. मात्र श्री. जावळे यांचा पराभव कोणी घडवून आणला? यावर कोणी कसं बोलत नाही; अशा आशयाची पोस्ट डॉ. चौधरी यांनी सोशल मिडियावर फॉरवर्ड केली आहे. श्री. जावळे यांना मंत्रिपदाची संधी मिळू नये, म्हणून पक्षातून त्यांचा पराभव होण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि कॉंग्रेस उमेदवाराला रसद पुरवली गेली. श्री. जावळे हे ही बहुजन समाजाचे नेते होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

संबंधीत बातम्या > तर मला वेगळा विचार करावा लागेल : खडसे 

नव्या चर्चेला फुटले तोंड 
दरम्यान, पराभवानंतर श्री. जावळे यांनी आतापर्यंत कुठेही खासगीत अगर जाहीररीत्या पराभवाच्या कारणांची चर्चा केली नाही किंवा कोणावर खापर ही फोडलेले नाही. मात्र त्यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक असलेल्या डॉ. चौधरी यांच्या या पोस्टमुळे पक्षातील वातावरण ढवळून निघाले असून एका नव्या चर्चेला तोंड फूटले आहे. 

क्‍लिक करा > खडसेंनी पाडापाडी करणाऱ्यांची नावे जाहिर करावी : महाजन 

चर्चा नेत्यांच्या जागेची; आपण कार्यकर्ते ः जावळे 
पोस्टबाबत श्री. जावळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की माझ्या हितचिंतकांनाही वाटते की आपल्या पराभवाच्या कारणांची चर्चा व्हावी. पण आपण त्यांना सांगितले आहे, की ज्या दोघा जागांच्या पराभवाची चर्चा होत आहे. त्या नेत्यांच्या जागा आहेत; आपण पक्षातील सामान्य कार्यकर्ते आहोत. आपल्या पराभवाची कारणे पक्षश्रेष्ठींनी आपल्यालाही विचारली होती आणि आपण त्यांना ती सविस्तर सांगितली आहेत. मात्र या विषयाची आपण बाहेर कुठेही चर्चा करणार नाही असेही जावळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news social meda vairal post haribhavu javle