एसपीं'च्या विशेष पथकातील असल्याचे सांगत वसुली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

"एसपीं'च्या विशेष पथकातील असल्याची बतावणी करून हे दोघे संशयित वसुली करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव : येथील मेहरुण चौपाटीवर प्रेमी युगुलांची छायाचित्रे काढून कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणारे तोतया पोलिस पवन रमेश काळे व रवींद्र भागवत चौधरी या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यावर दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, या "एसपीं'च्या विशेष पथकातील असल्याची बतावणी करून हे दोघे संशयित वसुली करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोघांना पाहण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. 

एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या पवन रमेश काळे व त्याचा साथीदार रवींद्र भागवत चौधरी या दोघांनी गुन्ह्याची कबुली देताना चार प्रेमीयुगुलांना लुबाडल्याची माहिती दिली असून प्रमुख संशयित पवन काळे याचे एका मुलीवर प्रेम आहे. त्याने वडिलांच्या खात्यातून 70 हजार रुपये त्या मुलीला घर बांधण्यासाठी दिले होते. कमी श्रमात जास्तीचा पैसा कमावण्याच्या नादात त्याने हा मार्ग पत्करल्याचे पोलिसांना सांगितले. 

"एसपीं'चे पथक बरखास्त 
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यातर्फे मुख्यालयातील "आरसीपी' कमांडो कार्स पूर्ण केलेल्या तरुण पोलिसांचे पथक तयार केले होते. शहरातील बाजारपेठ, महामार्गासहमुख्य रस्त्यांवर रश ड्रायव्हिंग, अवैध वाहतुकीवर हे पथक कारवाई करुन गुन्हे दाखल करीत होते. मात्र, पथकाच्याच तक्रारी वाढल्या. नशिराबाद - जळगाव दरम्यान झालेल्या अपघाताच्या ठिकाणी हेच दोन भामटे सर्वप्रथम पोचले. जखमींना घेऊन जाण्याची विनंती केल्यावर दोघांनी आमची हद्द नाही, असे म्हणत पळ काढला होता. तर वाळूमाफियांची वाहने थांबवून त्यांच्याकडून वसुलीच्याही तक्रारी आहेत. आम्ही "एसपीं'च्या विशेष पथकातील असल्याचे सांगत दोघेही वसुली करीत होते. या दोघांमुळे खऱ्या पोलिसांवर संशय बळावल्याने मुख्यालयातील गस्तीपथकच बंद झाले आहे. दोघांचे बिंग फुटल्यावर कोठडीसाठी दोघांना न्यायालयात हजर केल्यावर वाळू व्यावसायिकांनी दोघांना बघण्यासाठी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती. 

आर्वजून पहा :पालकमंत्र्यांचा तरुणांना अजब सल्ला.. म्हणाले, परमिट रुम ...
 

पोलिस साहित्य विक्रीवर निर्बंध हवे 
पवन काळे याने पोलिस साहित्य विक्री करणाऱ्या दुकानातून "कमांडो'चा गणवेश, ट्रॅकसूट खरेदी केला. सोबतच पोलिसांची फायबर काठी आणि पोलिस निरीक्षक वापरत असलेल्या रिव्हॉल्वरचे सरकारी शिक्‍का असलेले चामडी कव्हर खरेदी करून त्यात "एअरगन' लावून तो पोलिस झाला होता. दीड हजारात त्याने हे सर्व साहित्य खरेदी करून खंडणी उकळण्यास सुरवात केली होती. पूर्वी पोलिसांचे हे सर्व साहित्य सरकारी कॅन्टीन मुख्यालयातून वाटप करण्यात येत होते. मात्र, खासगीकरण झाल्याने हे सर्व साहित्य खुल्या बाजारात उपलब्ध झाले असून त्याचा गैरफायदा घेतल्याचे अनेक प्रकार वेळोवेळी समोर येत असताना त्यावर कुठलेच निर्बंध अद्याप आणण्यात आलेले नाही. 
 

हेपण पहा : आहो आश्‍चर्यच ना ! शेजारणीने दिला त्रास...अन्‌ बकरी पोहचली पोलिस ठाण्यात 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news bogas polise sp scood aunligali Recovery