सोने तेजाळले...उच्चांकी 44 हजारांचा दर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

सोन्या-चांदीच्या दरातील वाढ "कोरोना'च्या प्रभावामुळे आहे. डॉलरचा भाव प्रचंड वाढत असून, त्यामुळे सोन्याचे दरही वाढत आहे. येत्या काळात हे दर कमी होतील, असे दिसत नाही. बाजारपेठेतील स्थिती कमालीची अस्थिर आहे. 
- अजय ललवाणी (व्यावसायिक) 

जळगाव : जगभरात धडकी भरविणाऱ्या "कोरोना' या संसर्गजन्य रोगाचा सोने-चांदीच्या जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. या घडामोडीत डॉलरचा भाव गेल्या आठवडाभरात चांगल्याच वधारल्याने आज सोन्याच्या दरानेही आतापर्यंतचा उच्चांक गाठत 44 हजार रुपये प्रतितोळा एवढा आकडा गाठला. 

गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात "कोरोना'चा संसर्ग वाढत असून, त्यामुळे सर्वच देशांमधील अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. चीनमधील अर्थव्यवस्था "कोरोना'ने प्रभावित केल्यानंतर अन्य देशांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारत बहुतांश माल आयात करतो, तर मर्यादित स्वरुपाच्या वस्तू निर्यात करतो. एकीकडे आपल्याला इंधन तेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते, तर दुसरीकडे जगभरातील उद्योग "कोरोना'मुळे प्रभावित झाले आहेत. त्याचा एकत्रित परिणाम डॉलरचा दर वाढला असून, दोन दिवसांपूर्वी 71 रुपये 72 पैसे असा डॉलरचा दर आज 74 रुपये 40 पैशांपर्यंत पोचला. त्यामुळे स्वाभाविकत: सोन्याचा दरही वाढला असून, कालच्या 43 हजार 800 वरून त्याने आज थेट 44 हजारांचा आकडा पार केला. 

नक्की वाचा :"कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित 
 

आठवडाभरात चढ-उतार 
गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात बऱ्यापैकी चढ-उतार सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी 42 हजार 800 पर्यंत भाव उतरले होते. मात्र, नंतर दोन-तीन दिवसांतच सोने 43 हजार 700, 43 हजार 800पर्यंत पोचले. आज हेच भाव 44 हजारांवर गेले. चांदीबाबतीतही कमालीचा चढ-उतार होत असून, एकूणच बाजारपेठेत संभ्रमाचे वातावरण आहे. 

क्‍लिक कराः  अमरीश पटेलांच्या राजीनाम्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूक जाहीर 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Gold High rate of 44 thousand