खुशखबर...तांदळाच्या दरात झाली घसरण ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुढील महिन्यापासून नवीन गव्हाची आवक होणार असल्याने यावर्षी गहू व तांदळाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येत असल्यामुळे ग्राहकांमध्य समाधान व्यक्त केले जात आहे. 

जळगाव : यंदा भात पिकाचे उत्पन्न वाढले आहे. त्यातच भारतातील तांदूळ निर्यात थांबल्याने बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होत आहे. परिणामी, बासमतीच्या किमतीत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तसेच पुढील महिन्यापासून नवीन गव्हाची आवक होणार असल्याने यावर्षी गहू 
व तांदळाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येत असल्यामुळे ग्राहकांमध्य समाधान व्यक्त केले जात आहे. 

दरवर्षी डिसेंबर व जानेवारी या कालावधीत तांदळाचा हंगाम सुरू होतो. नवा तांदूळ या काळात बाजारात येतो. वर्षभरासाठीचा तांदूळ या काळातच अनेक जण घेतात. यावर्षी तांदळाचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. भारतातील जवळपास 70 टक्के बासमती तांदूळ निर्यात होतो. परंतु आता तांदूळ निर्यातीवर बंदी आल्याने देशांतर्गत बाजारपेठेत आवक वाढली आहे. परिणामी, किमतीमध्येही घट झाली आहे. ग्राहकांना काही दिवस कमी भावात तांदळाची खरेदी करता येणार आहे. यंदा भात पीक जास्त असल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ग्राहकांना यंदा बासमती स्वस्त मिळेल. तर शासनाने यावर्षी गव्हाला 1 हजार 925 हमीभाव दिल्यामुळे भाव कमी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही ग्राहक बाजारात नवीन गहू येण्याची वाट पाहत आहेत. 

हेपण पहा : जळगाव जिल्ह्यातील 361 रेशन दुकानदारांची अनामत जप्त 
 

तांदूळ बाजारभाव (प्रतिक्विंटल) 
परिमल- 2400 ते 2450 
मसुरी- 2500 ते 2600 
सुगंधी चिनोर- 3100 ते 3200 
कालीमुछ- 3800 ते 4000 
बासमती- 6500 ते 10,000 
आंबामोहर- 6000 ते 6200 

गहू बाजारभाव (प्रतिक्विंटल) 
वन-फोर-सेव्हन - 2550 ते 2650 
लोकवन- 2500 ते 2550 
शरबती- 2650 ते 2700 
चंदोसी- 3800 ते 4000 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news good news Rice prices fell