चिडी मारायची बंदूक..अन्‌ गुलाबभाऊंची कसरत!

gulabrav patil
gulabrav patil
Updated on

जळगावः सत्तेत असो की नसो.. मंत्रिपद, आमदारकी या पदांची आपल्या, म्हणजे जनतेच्या कामांसाठी कधी गरज पडत नाही, अशी गुलाबभाऊंची "स्टाइल'. मतदारसंघात कुण्या विभागाची तक्रार आली की भाऊ "स्टाइल' वापरून त्या विभागाचा अन्‌ अधिकाऱ्याचाही समाचार घेता.. अशी त्यांची ख्याती. गेल्या टर्ममध्ये गुलाबभाऊंना "चीडी मारायची बंदूक' मिळाली.. त्यातून फार काही साधता आलं नाही. आता मिळालेलं "कॅबिनेट' कुठल्या बंदुकीच्या प्रकारात बसतंय.. माहीत नाही. पण जिल्ह्याचं पालकत्वंही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पारंपरिक "स्टाइल' न वापरता आता त्यांना स्वत:च जिल्ह्यासाठी काम करून दाखवावं लागणार आहे.. शिवाय, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धीच आता महाविकास आघाडीतील घटक असल्याने गुलाबभाऊंची चांगलीच कसरत होणार आहे. 

काही लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघात अथवा क्षेत्रात कोणत्याही विभागाशी अथवा विकासाशी संबंधित काम करून घेण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्‍यकता नसते. माजीमंत्री, माजी आमदार एकनाथराव खडसे असोत की, विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील.. या दोघांचीही नावे त्यासाठी घेतली पाहिजेत. अर्थात, या दोघा नेत्यांची काम करून घेण्याची शैली (स्टाइल) वेगवेगळी. खडसेंना प्रत्येक विभाग, योजना, कामाचा अनुभव.. म्हणून अधिकारी त्यांची दिशाभूल करू शकत नाही.. आणि गुलाबरावांकडे "शिवसेना स्टाइल', त्यामुळे त्यांच्या शब्दाचाही प्रशासकीय स्तरावर तेवढाच "आब' राखला जातो.. 

आर्वजून पहा : जन्मदात्याच्या शाळेला मुलाची अनोखी भेट

आतातर खडसे आमदारही नाहीत.. पण, त्यांच्याकडे कुण्या कार्यकर्त्याने काम नेले आणि ते त्यांनी शासकीय स्तरावर पोचविले तर त्या कामास "नाही' म्हणायची कुणाची ताप नाही. गुलाबभाऊ मात्र आता मंत्रीच आहेत. गेल्या टर्ममध्ये सहकार खात्याचं राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी "चिडी मारायची बंदूक' असा उल्लेख करत हतबलता दर्शवली होती. आता त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद, जोडीला जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही मिळालंय.. मंत्रिपद, खातं आणि पालकत्व स्वीकारून दोन महिनेच झाले, या पदामुळे सध्या गुलाबभाऊ हारतुरेच स्वीकारताना दिसताहेत. मात्र, आता "चिडी मारायची बंदूक' असं म्हणायची सोय त्यांना राहिली नाही. कारण, विरोधात काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या कामाची वेगळीच छाप उमटवली आहे. आता तर प्रतिष्ठेचे असे पालकमंत्रिपद असल्याने त्यानिमित्ताने महत्त्वाचे अधिकारही त्यांच्याकडे आहेत. 

सध्या जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. सिंचन प्रकल्प, महामार्ग चौपदरीकरणाची कामे, रस्त्यांची कामे, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मंजूर कामे.. अशी भलीमोठी यादी आहे. त्यातील रस्ते व महामार्ग चौपदरीकरणाचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. महामार्गावर रोज अपघात होऊन बळी जात आहेत. फागणे- तरसोद काम पूर्णपणे ठप्प आहे. तरसोद- चिखली रस्त्याचे काम बऱ्यापैकी मार्गी लागले असले तरी ते मुदतीत पूर्ण होणे गरजेचे आहे. अंकलेश्‍वर- बऱ्हाणपूर रस्त्याबाबत अद्याप कोणतीही प्रक्रिया नाही. जळगाव- औरंगाबाद रस्त्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे. या रस्त्यावरील वाहतूक चाळीसगावमार्गे वर्षभरापासून वळविण्यात आलीय.. जळगाव, भुसावळ शहरातील "अमृत' योजनेचे काम तेथील नागरिकांची "विषा'ची परीक्षा घेत आहे.. 

नक्की पहा : मुलाचा साखरपुडा करून घरीही नाही गेले तोच... 

गुलाबभाऊंपुढे ही कामे पुढे नेताना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यांच्या ग्रामीण मतदारसंघात तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धीच आता महाविकास आघाडीतील घटक असल्याने त्यांच्या विरोधात भूमिका घेत पालकत्व निभावण्याची दुहेरी "कसरत' करावी लागणार आहे.. आता ही कसरत ते कधी साधतात, हे बघणे औत्सुक्‍याचे ठरेल..! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com