"हेल्पफेअर"चे तिसरे पर्व मदत अन्‌ मार्गदर्शनाचे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

"हेल्प फेअर' गेल्या तीन वर्षांपासून काम करीत आहे. यंदाचे "हेल्प फेअर- 3'चे पर्व हे निश्‍चितच संस्थांना मदतीचा हात देणारे आणि मार्गदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणारे ठरणार आहे. 

जळगाव  : समाजात देणारे व घेणारे दोन्ही घटक आहेत. यामुळेच समाजाचा समतोल आजही टिकून आहे. याच अनुषंगाने देणारे आणि घेणारे या दोघांना एकत्र आणून त्यांना जोडणारा दुवा म्हणून "हेल्प फेअर' गेल्या तीन वर्षांपासून काम करीत आहे. यंदाचे "हेल्प फेअर- 3'चे पर्व हे निश्‍चितच संस्थांना मदतीचा हात देणारे आणि मार्गदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणारे ठरणार आहे. 

जळगावात गेल्या तीन वर्षांपासून हेल्प-फेअर हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदाचे प्रदर्शन 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आले असून, सागर पार्क मैदानावर याची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या "हेल्प-फेअर 3' मध्ये विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी या निमित्ताने खानदेशकरांना मिळणार आहे. दोन वर्षात हेल्प-फेअरमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यंदा जिल्ह्यातील संस्थांसोबतच जिल्ह्याबाहेरील संस्थांचा देखील समावेश असणार आहे. यात साधारण पन्नास संस्थांचे स्टॉल आणि चाळीस सेवाव्रतींच्या गॅलरीचा समावेश असणार आहे. तसेच शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवणाऱ्या स्वच्छतादूतांचा "हेल्प-फेअर 3'मध्ये सन्मान करण्यात येणार आहे. 

हेपण पहा : आहो आश्‍चर्यच ना ! शेजारणीने दिला त्रास...अन्‌ बकरी पोहचली पोलिस ठाण्यात 
 

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी 
सेवाकार्याच्या या कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांच्या करमणुकीसाठी येथे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे, संस्थांचे तसेच दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे. यासोबतच संपूर्ण प्रदर्शनी पाहण्यात बराच वेळ जात असल्याने येथे खाद्यप्रेमींसाठी खानदेशी आणि विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहे. सदर फूड स्टॉल बचत गट चालविणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे. 

 

संस्था चालकांसाठी कार्यशाळा 
"हेल्प-फेअर 3'मध्ये सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्हा आणि बाहेरून येणाऱ्या विविध संस्थांच्या संस्था चालकांसाठी हेल्प-फेअर टीमतर्फे विनामूल्य कार्यशाळा घेण्यात येत आहे. 16 फेब्रुवारीला धर्मदाय नोंदणी कार्यालय अधीक्षक विश्वनाथ तायडे हे "स्वयंसेवी संस्था- कायदेशीर पूर्तता' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर 17 फेब्रुवारीला मुंबई येथील शैलेश निपुनगे हे "केंद्रीय बजेट व स्वयंसेवी संस्था' या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर कार्यशाळा हॉटेल कोझी कॉटेज येथे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. 

नक्की पहा :पाच वर्षाची चिमुरडी ती...धावली, ओरडली अन्‌ बहिणीला वाचविले 
 

सिंधूताई सपकाळ यांची उपस्थिती 
"हेल्प-फेअर 3'चा समारोप अनाथांची आई सिंधूताई सपकाळ यांच्या समारोपीय मार्गदर्शनाने होणार आहे. या निमित्ताने त्यांचे सामाजिक विचार, त्यांचा प्रवास याचा उलगडा होईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन हेल्प-फेअर टीमकडून करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Third episode of "Helpfair"