मालमत्ता फेरमूल्यांकनामुळे 30 कोटीचे उत्पन्न वाढणार 

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मिळकतीची फेरमूल्यांकन आकारणी करण्याची प्रक्रिया संपण्यात आली आहे. या फेरमूल्यांकनामुळे महापालिकेला मालमत्ता करातून येणाऱ्या उत्पन्नापेक्षा सुमारे 30 कोटींचे अधिक उत्पन्न मिळणार आहे. तर केलेल्या सर्वेक्षणात 1 लाख 16 हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून, लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे. 


महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींवर महापालिकेकडून मालमत्ता कर लावण्यासाठी आकारणी केली जाते. महापालिका प्रशासनाने ज्यावेळी कर आकारणी सुरू केली, तेव्हा त्यांनी तळमजला 100 टक्के, पहिला मजला 75 टक्के तर दुसऱ्या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास 50 टक्के अशी आकारणी केली होती. परंतु केंद्रीय लेखा परीक्षणात ही कर आकारणी चुकीची असल्याचा आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे 1997 ते 2017 पर्यंत आकारण्यात आलेली मालमत्ता कराची आकारणी चुकीची असल्याने महापालिका प्रशासनाकडून 2017 ला फेरमूल्यांकनाचे काम अमरावतीच्या स्थापत्य एजन्सी या मक्तेदाराच्या माध्यमातून करण्याचे काम सुरू केले. 

सर्वेक्षणात मिळकती जास्त आढळल्या 
स्थापत्य एजन्सीमार्फत मिळकतींचे सर्वेक्षण करून फेरमूल्यांकनाचे काम सुरू केले. यात प्रत्येक मिळकतींना नंबरींग देणे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप करणे, घराचे फोटो काढून नकाशे तयार करणे. तसेच ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. आधी 96 हजार 945 मिळकती महापालिकेच्या दफ्तरी नोंद होत्या. सर्वेक्षणानंतर आता 1 लाख 16 हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून, तब्बल 19 हजार 55 मिळकतींची वाढ झाली आहे. मालमत्ता करातून महापालिकेला 28 कोटींचे उत्पन्न मिळायचे. मात्र आता सुमारे 60 ते 65 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. 

...अशी असणार कर आकारणी 
महापालिकेकडून आता फेरमूल्यांकन केले जात असून, नवीन पद्धतीने कर आकारणी आता केली जाणार आहे. यात तळमजला, पहिला मजला 100 टक्के, दुसरा मजला 95 टक्के, तर तिसऱ्या मजल्यापासून 90 टक्के प्रमाणे आकारणी केली जाईल. बहुमजली इमारतीत एक ते चौथ्या मजल्यापर्यंत 100 टक्के आकारणी तर पाचव्या मजल्यापासून 5 टक्‍क्‍याने वाढ करत 105 टक्‍क्‍यांनी आकारणी होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com