बाबासाहेबांच्या प्रेरणेतून ट्रान्स्फॉर्मर उद्योगात भरारी 

sanjay and saroj ingale
sanjay and saroj ingale

जळगाव : दलित तरुणांनी खासगी क्षेत्रात उद्योगशीलता जपल्याशिवाय भारताचा उद्धार होणार नाही, या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेत अनेक उद्योजक उभे राहिले. कोणतीही परिस्थिती एका दिवसात बदलत नसते, ती बदलायची असेल तर सर्वंकष प्रयत्न करावे लागतात. असेच प्रयत्न संजय इंगळे यांनी केले असून, ट्रान्स्फॉर्मर उद्योगात भरारी घेतली आहे. महाराष्ट्रातील "महावितरण'च्या आठ परिमंडळांत त्यांनी उद्योगाचा विस्तार केला आहे. त्यांची ही यशोगाथा... 

मेहूण (ता. मुक्‍ताईनगर) येथील मूळ रहिवासी असलेल्या इंगळे कुटुंबीयांनी गावात रोजगाराची मारामार होत असल्याने जळगाव जिल्हा सोडून 1955-56 मध्ये गुजराकडे जाण्याचा निर्णय घेतला. (कै.) भीमराव इंगळे, (कै.) नारायण इंगळे, यशवंत इंगळे, रमेश इंगळे, खुशाल इंगळे या पाच भावांचे कुटुंब कामासाठी एक एक करत बडोदा येथे गेले. आशा ब्राऊन बोरी या ट्रान्स्फॉर्मर कंपनीत रिपेअरिंगची बरीच वर्षे काम केल्यानंतर आपण उद्योजक का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न इंगळे कुटुंबाला पडला. पाचही भावांनी एकत्र येत यामागील कारणे शोधली. जागा, शिक्षण आणि भांडवल अशी तीन प्रमुख कारणे समोर आली. त्यावर मात करत भाड्याच्या जागेत दोन भावांनी अहमदाबादला, एकाने भुसावळला उद्योग सुरू केला. भुसावळ येथे तांत्रिक अडचणीमुळे अपयश आले. अखेर सुरतला भागीदारीत उद्योग सुरू केला. अशा रीतीने इंगळे कुटुंबीयाने गुजरात व महाराष्ट्रात उद्योग स्थापन करून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 


संजय नारायण इंगळे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन करून उद्योगविश्‍वात यश मिळत असल्याचे लक्षात घेत काका भीमराव इंगळे यांच्यासमवेत 1997 मध्ये जळगाव गाठून रोजगार देण्याची किमया आशिष इलेक्‍ट्रिकल्सच्या माध्यमातून साधली. औरंगाबाद, नागपूर, मुंबई, जळगाव येथील "महावितरण'च्या विभागांना ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती करून देत त्यांची अपेक्षा पूर्ण केली. आता त्यांनी उच्चदाब क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर (16000 के.व्ही.) दुरुस्ती आणि निर्मितीच्या क्षेत्रात आपल्या कामामुळे वेगळा ठसा उमटविला आहे. जळगाव, नाशिक, अकोला, लातूर, नांदेड, रत्नागिरी, बारामती, पुणे या आठ परिमंडळांचे काम ते करतात. 

पत्नीची लाभतेय साथ 
आशिष इलेक्‍ट्रिकल्सचा कारभार वाढल्यानंतर जळगावात संजय इंगळे यांनी दुसरे युनिट तक्षिता इलेक्‍ट्रिकल्स वर्क्‍स नावाने सुरू केले आहे. त्याचे काम त्यांच्या पत्नी सरोज इंगळे पाहत आहेत. संजय इंगळे यांना वेळोवेळी मोठे भाऊ दिलीप इंगळे यांचीही साथ लाभत असते. जळगावात 45 जणांना रोजगार देण्यात हे कुटुंबीय यशस्वी झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात येत असून शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली जाते. 

आव्हान पेलल्याशिवाय यश नाही 
संजय इंगळे आताच्या तरुणाईला सांगू इच्छितात, की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा उद्योजक होण्याचा विचार करा. हा एक निर्णय तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो. छोट्या उद्योगापासून सुरवात करा. उद्योग सुरू करण्याअगोदर आपल्यातील उणिवा शोधून क्षमता वाढवा. अडचणींवर मात करीत एक एक यशाची पायरी चढत जा. आजची तरुणाई आव्हान स्वीकार नाही, कमी मेहनतीत जास्त फायद्याचा विचार करते. तसे होत नसते. म्हणून उद्योगात संयम ठेवत टिकून राहणे खूप महत्त्वाचे असते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com