संचारबंदीने... अमळनेर तालुक्यातील गावागावांमध्ये शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

पातोंडा गावापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या मुंगसे गावाला कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. स्वतःहून संपूर्ण संचारबंदीचे पालन केले जात आहे.

अमळनेर :  मुंगसे (ता. अमळनेर) येथील एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत सेफ मानल्या जाणाऱ्या अमळनेरच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने तालुका चांगलाच हादरला आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यात संचारबंदी कडक करण्यात आली आहे. अनेक गावे प्रवेशद्वार बंद करून सील करण्यात आले आहेत. 

 आर्वजून पहा : "त्या'... कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकामुळे जिल्हावासीयांना टेंशन 
 

अमळनेर शहरासह तालुक्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंगसे, दापोरी, रूंधाटी, मठगव्हाण, पातोंडा, सावखेडा आदी गावे पूर्णतः लॉक झाली आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर शहरातीलही एका महिलेचा मृत्यू झाला असून, त्या महिलेचा अहवाल अद्याप आलेला नाही. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे नियमित गस्त घालत आहेत. 

सर्व व्यवहार बंद 
शहरासह तालुक्यातील अत्यावश्‍यक सेवांचीही दुकाने बंद करण्यात आली आहेत. हॉस्पिटल वगळता शहरातील बँक, दूध विक्रेते, किराणा दुकान, मेडिकल दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली आहेत. जो बाहेर दिसेल त्याला पोलिसांच्या प्रसादाला सामारे जावे लागत आहे. कालपासून (ता. १९) तीन दिवस कडक संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घरात राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

नक्की वाचा :जळगाव जिल्ह्यातील बळिराजाला 400 कोटींचा फटका
 

मुंगसे परिसरात कडक बंदोबस्त 
कोरोनाग्रस्त महिलेच्या पार्श्वभूमीवर मुंगसे व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. वैद्यकीय पथकाकडून होम टू होम ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली आहे. परिसरातील सावखेडा, दापोरी, रूंधाटी येथेही घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. कुणाला काही लक्षणे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पातोंडा येथे प्रवेशद्वार बंद 
पातोंडा गावापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या मुंगसे गावाला कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. स्वतःहून संपूर्ण संचारबंदीचे पालन केले जात आहे. पातोंडा ग्रामस्थांनी विक्रेते व बाहेरून येणाऱ्यांना सर्व रस्ते बंद केले आहेत. न्यू प्लॉट मित्र मंडळाने प्लॉटमध्ये येणारे सर्व मार्ग बंद करून स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे. गावातील बस स्थानक परिसर, महादेव चौक, तानाजी मालूसरे चौक हे गावात प्रवेशाचे मार्ग देखील स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बंद करण्यात आले. गावात गावठी दारूचे अड्डे वगळता सगळीकडे संचारबंदी गांभीर्याने घेतली जात आहे. 

पातोंडा व मुंगसे गावाच्या शेत शिवार लागून असल्याने शेतकरी व मजूरांमधे भीती आहे. कोरोनाबाधीत रूग्ण पातोंडा येथील बडोदा बँकेत व प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती अशी अफवा पसरली. मात्र सरपंच किशोर मोरे, उपसरपंच सोपान लोहार, महेंद्र पाटील व भूषण बिरारी यांनी या बाबींची शहानिशा करून लोकांचा गैरसमज दूर केला आहे. सरपंच श्रीमती रेखा मोरे यांनी तत्काळ निर्णय घेऊन पातोंडा ग्रामपंचायतीतर्फे टीसीएलची फवारणी करून संपूर्ण गाव सॅनिटाईज करून घेतले. 

क्‍लिक कराः कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mararthi news amalner Shukushkat in the villages of Amalner taluka with the ban of communication