esakal | शिक्षण विभाग वाऱ्यावर.. ‘ब’ वर्ग अधिकाऱ्यांची चारशेवर पदे रिक्‍त 
sakal

बोलून बातमी शोधा

officer seat vacant

शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील राज्य शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा आणि शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब मधील संवर्गातील बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी शासनाने नुकतीच घोषित केले आहे.

शिक्षण विभाग वाऱ्यावर.. ‘ब’ वर्ग अधिकाऱ्यांची चारशेवर पदे रिक्‍त 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. पूर्ण वेळ अधिकारी नाहीत. शिक्षणाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. राज्यात गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता आदी पदे तब्बल चारशेपेक्षा अधिक रिक्त आहेत. त्यातच बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे आधीच पदे रिक्त त्यात बदल्यांची धावपळ आदींमुळे आगामी शैक्षणिक नियोजनाचे बारा वाजणार असल्याची मते जाणकारांमधून व्यक्त होत आहे. 

शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील राज्य शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा आणि शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब मधील संवर्गातील बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी शासनाने नुकतीच घोषित केले आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांनी विहित नमुन्यामध्ये पसंतीक्रमाची माहिती आयुक्त शिक्षण यांच्याकडे आठ एप्रिलपर्यंत जमा करायची होती. तसेच आयुक्त कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाकडे बारा एप्रिलपर्यंत सादर करायची आहे. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी विनंती अर्ज सादर केले आहेत. ते आता विचारात घेतले जाणार नाहीत. जे अधिकारी पसंतीक्रम देणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या रिक्त पद भरण्याच्या निकषानुसार पदस्थापना दिली जाणार आहे. 

पाचशे अधिकारी बदलीच्या रांगेत
पद स्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मुदतपूर्व बदलीसाठी ते अर्ज करू शकणार नाहीत. राज्यात शिक्षण विभागातील मोठ्या प्रमाणात बदल्या होऊ घातलेले आहेत. यात उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी वेतन व भविष्यनिर्वाह पथकाचे अधीक्षक, शालेय पोषण आहाराचे अधीक्षक, कनिष्ठ प्रशासनाधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधीक्षक, आयुक्तालयाचे विशेषाधिकार, डायटचे अधिव्याख्याता आदींच्या बदली होऊ घातलेल्या आहेत. तसेच आगामी काळात पाचशेपेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत 

राज्‍यात अशी आहे स्‍थिती
राज्यात रायगड, ठाणे, पालघर, नगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील प्राथमिक विभागात प्रत्येकी दोन उपशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक शिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. माध्यमिक विभागात पालघर, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन व तीन उपशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये किमान एक पद रिक्त आहे. 

गटशिक्षणाधिकारीची दोनशे जागा रिक्‍त
राज्यात गटशिक्षणाधिकारी पदे २०० पेक्षा अधिक रिक्त आहेत. यात अलिबाग, खानापूर, कर्जत, मसाळा, मुरुड, माणगाव, पोलादपूर, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, डहाणू, नगर, अकोले, कोपरगाव, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बागलाण, चांदवड, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नाशिक, नांदगाव, देवळा, निफाड, सुरगाणा, सिन्नर, धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल आदी तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त कारभार सोपविलेला आहे. 

३१ मेनंतर संख्या आणखी वाढणार
अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण समाज शिक्षणाधिकारी, कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक वाणिज्य निरीक्षक, शिक्षण मंडळाचे साहाय्यक सचिव, शासकीय विद्यानिकेतनचे वसतिगृह प्रमुख, समन्वयक प्रशासन अधिकारी आदी पदे रिक्त आहेत. तर ३१ मेस निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढणारच आहे. दरम्यान राज्यातील महत्त्वपूर्ण शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यावर सोपविलेला आहे. यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ही पदे तात्काळ भरणे अत्यावश्यक आहे. 


संपादन- राजेश सोनवणे

loading image