भाजपच्या काही नेत्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान : अनिल गोटे

निखील सुर्यवंशी
Tuesday, 29 December 2020

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी स्वामीनाथन आयोगाच्या २०१ शिफारशींपैकी २०० शिफारशी स्विकारीत असल्याचे संसदेतील कामकाजावेळी सांगितले होते. त्यातून भाजपने शेतकऱ्यांचे आश्वासनांची खैरात करत स्वप्नरंजन केले.

धुळे : देशातील दोन अहंकारी नेते शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहेत. आयुष्यात कधी शेती केली नाही असे भाजपचे काही शहरी नेते बेधडकपणे शेतकऱ्यांना अतिरेकी, दहशतवादी, देशद्रोही, पाकिस्तान व चीनचे हस्तक म्हणून अपमानीत करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून केला. 

गोटे म्हणाले, की केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी स्वामीनाथन आयोगाच्या २०१ शिफारशींपैकी २०० शिफारशी स्विकारीत असल्याचे संसदेतील कामकाजावेळी सांगितले होते. त्यातून भाजपने शेतकऱ्यांचे आश्वासनांची खैरात करत स्वप्नरंजन केले. वर्ष उलटल्यावरही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्विकारण्याबाबत आश्वासनाचे काय झाले? याबाबत कोणताही दृष्यपरिणाम शेतकऱ्यांना जाणवण्यापूर्वीच कृषी विषयक तीन नवे कायदे शेतकऱ्यांवर लादण्यात आले आहेत. 
भारतीय जनता पक्षाचे नेते शब्दच्छल करत आहेत. ते शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहेत. 

हमीभावाचा कुठेही उल्‍लेख नाही
उत्पादन व उत्पन्नाची गल्लत करुन शेतकऱ्यांना फसवित आहेत. देशातील जाणकार व अभ्यासू शेतकरी दिल्ली सिमेवरील आंदोलनाव्दारे पेटला तो यासाठीच की केंद्र सरकारने तीन नव्या कृषी कायद्यांमध्ये आधारभूत किंमत किंवा ५० टक्क्यांपेक्षा जास्त हमीभावाचा कुठेही शब्दाने उल्लेख केलेला नाही. उलट अदानी- अंबानींच्या खासगी कंपन्यांना या नव्या कृषी कायद्यामुळे शेतीवर अधिराज्य गाजवण्याची वाट मोकळी करून दिल्याचा आरोप श्री. गोटे यांनी मोदी सरकारवर केला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news bjp ncp anil gote statment farmer