अमळनेरचा पळालेला तो रूग्ण घरी सापडला

निखिल सूर्यवंशी
Sunday, 10 May 2020

पहिल्यांदा तब्बल 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात अमळनेरची (जि. जळगाव) महिला व पुरुष, असा दोघांचा समावेश आहे. त्यातील पुरुष रुग्ण रात्रीच पळून गेला. बऱ्याच कालावधीनंतर रुग्णालयास ते कळाले. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

धुळे : येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकडून शुक्रवारी रात्री अकराला जाहीर अहवालानंतर एकाच वेळी पहिल्यांदा तब्बल 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात अमळनेरची (जि. जळगाव) महिला व पुरुष, असा दोघांचा समावेश आहे. त्यातील पुरुष रुग्ण रात्रीच पळून गेला. बऱ्याच कालावधीनंतर रुग्णालयास ते कळाले. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. शोधाशोध व अमळनेर पोलिसांना माहिती दिल्यावर तो रुग्ण त्याच्या अमळनेर येथील घरी पोहोचल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

क्‍लिक करा - धुळे जिल्हा मुख्य टपाल खात्यातील अधिकारीही "कोरोना' बाधित 

धुळे तालुका शिवारातील वाहन अपघातानंतर उत्तर प्रदेशातील मजूर रुग्ण तपासणीनंतर येथे पॉझिटिव्ह आढळला. तोही तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर गरोदर पत्नी, चार वर्षांच्या मुलीला घेऊन पळून गेला होता. तो सापडला नसल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हा प्रकार ताजा असताना अमळनेरचा दुसरा रुग्ण पळून गेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. त्यामुळे रुग्णालयासह पोलिसांची पुन्हा झोप उडाली. धुळे व अमळनेरच्या पोलिसांनी शनिवारी सकाळपासून शोधाशोध केल्यावर तो रूग्ण अमळनेर येथील घरी सापडला. त्याची आईदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा आहे.
  
पोलिसांनी दिली तंबी
जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातून कोरोना बाधित रूग्ण पळून जाण्याची गंभीर घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनाचा शनिवारी पारा चढला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वैद्यकिय यंत्रणेला धारेवर धरण्यात आले. हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालय आणि रूग्णालय व्यवस्थापनाने गांभीर्य जाणून घेत कोविड - 19 कक्ष, संशयितांच्या कक्षात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तयार केली पाहिजे. प्रवेशव्दारावर सुरक्षिततेच्या साधनांसह पाहरेकरी कर्मचारी उभे केले पाहिजे. त्यांच्या परवानगीशिवाय, डिस्चार्ज कार्ड दाखविल्याशिवाय रूग्णाला सोडता कामा नये, अशी सूचना देण्याची वेळ पोलिसांवर आली. त्यानुसार रूग्णालयाने कार्यवाही सुरू केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news corona positive patient run away and home