esakal | अजूनही लसीकरणाबाबत उदासीनता; केवळ पाच हजार व्यक्तींचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

अजूनही लसीकरणाबाबत उदासीनता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोनगीर (धुळे) : येथील ग्रामीण रुग्णालयात १५ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona vaccination) सुरू असून, लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, लसीकरणास तीन महिने होऊनही फक्त चार हजार ९९० व्यक्तींनी लस घेतली आहे. त्यामुळे लशीबाबत अद्यापही मोठे गैरसमज असून, अद्यापही मोठ्या प्रमाणात लोकांनी लसीकरणच करून घेतले नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून येथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने सोनगीर गाव कोरोनामुक्त (Corona free songir village) झाले, असे म्हणता येईल. (coronavirus-songir-village-not-responce-corona-vaccination)

हेही वाचा: मुलांमध्ये कोरोनाची सौम्य असतील लक्षणे; भीती नको, काळजी घ्या

जिल्ह्यात कोरोना (Dhule corona update) रुग्णांची, तसेच मृतांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली, तरी धोका टळलेला नाही. सोनगीर गावातील प्रत्येकाचे लसीकरण झाल्याशिवाय कोरोनाचा धोका टळणार नाही. मात्र, लसीबाबत अद्यापही वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. शासन, प्रशासन लस सुरक्षित असल्याचे सांगूनही लोकांवर परिणाम होत नाही. अफवांवर अशिक्षित, कमी शिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित व व्यापारीही विश्‍वास ठेवत आहेत.

आवाहनालाही प्रतिसाद नाही

सोनगीरची लोकसंख्या २५ ते ३० हजार असून, परिसरात ३५ ते ४० खेडी आहेत. एवढ्या लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या लोकांपैकी फक्त पाच हजार लोकांनी लसीकरण करून घेतले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. साधना पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे, डॉ. किरण निकवाडे, डॉ. स्वप्नील जाधव व कर्मचारी ग्रामस्थांना लसीकरण करण्याचे आवाहन करीत आहेत, पण आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: तब्बल..११३ दिवसानंतर जळगावची कोरोना रुग्ण संख्या शंभरीच्या आत !

गोंधळामुळे परिणाम..

कोरोनाचे निदान व्हावे, यासाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टिंगची सोय आहे, पण त्यालाही अजिबात प्रतिसाद नाही. येथे १५ मार्चपासून आतापर्यंत कोव्हॅक्सिनची दोन हजार ६९० लोकांनी लस घेतली आहे. कोव्हिशील्डचे दोन हजार ३०० डोस घेतलेले आहेत. एकूण चार हजार ९९० डोस दिले गेले आहेत. त्यांपैकी सुमारे दीड हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच अद्याप अनेक सोनगीरकरांनी एकही डोस घेतलेला नाही. गैरसमज, अफवा हे जसे एक कारण आहे तसेच कधी कोव्हॅक्सिन, तर कधी कोव्हिशील्ड अशा लशी येत असल्याने बराच गोंधळ उडत आहे. त्याचाही परिणाम लसीकरणावर होत आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात कोव्हिशील्डचे ३५० डोस उपलब्ध असून, ते ४५ व पुढील वयोगटातील व्यक्तींना दिले जाणार आहेत.