धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंकेच्या विभाजनाची ‘ठिणगी’ 

dhule nandurbar bank
dhule nandurbar bank

धुळे : गेल्या २०-२५ वर्षांपासून आपण आम्हाला सांभाळत आहात. धुळे जिल्ह्याने मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत बजावली आहे. आता तीच भूमिका स्वीकारून आम्हाला आमच्या पायावर उभे राहण्यासाठी धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा ठराव करा, अशी मागणी बँकेच्या नंदुरबार जिल्ह्यातील संचालक, सभासदांनी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे केली. हीच मागणी नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा बँकेचे संचालक चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली. 
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६३ वी सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २७) सकाळी दहाला येथील व्यंकटेश लॉन येथे झाली. बँकेचे अध्यक्ष श्री. कदमबांडे, श्री. रघुवंशी यांच्यासह इतर संचालक, सभासद उपस्थित होते. आजच्या सर्वसाधारण सभेत इतर कामकाजापेक्षा श्री. रघुवंशी व बँकेच्या नंदुरबार जिल्ह्यातील संचालक, सभासदांनी केलेल्या बँकेच्या विभाजनाची मागणी चर्चेचा विषय ठरली. 

विभाजनाची शिफारस करा 
श्री. रघुवंशी म्हणाले, की गेल्या २२ वर्षांपासून अमरिशभाई पटेल, श्री. कदमबांडे यांच्यासह संचालक मंडळाने आम्हा नंदुरबारकरांना सामावून घेतले, लहान भावासारखे सांभाळून घेतले, आमच्यासाठी एकदिलाने निर्णय घेतले. आजही बँकेचे कामकाज खेळीमेळीने सुरू आहे, कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, धुळे-नंदुरबार हे अंतर मोठे आहे. जिल्ह्याचे विभाजन होऊनही आता २२ वर्ष लोटली आहेत. त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या बँक असाव्यात, असा ठराव मी मांडतो. त्याला तुमची संमती व शिफारस असावी. शेवटी निर्णय शासनच घेणार आहे. त्यामुळे कोणतीही शंका-कुशंका न ठेवता शिफारस करावी, असे श्री. रघुवंशी म्हणाले. 

कदमबांडे यांची भूमिका 
श्री. रघुवंशी यांच्या मागणीच्या अनुषंगाने श्री. कदमबांडे म्हणाले, की बँकेचे विभाजन करायचे असेल तर मोठी प्रक्रिया राबवावी लागेल. शासन, नाबार्डची परवानगी आणावी लागेल. बँक वेगळ्या झाल्यावर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासह इतर सेवा-सवलती देण्यास अडचणी निर्माण होतील. मात्र शासनाकडून तुम्ही परवानगी मिळवून आणली तर आम्हीही निश्चितच विचार करू. शासनदरबारी तुमचे वजन असल्याचेही ते श्री. रघुवंशी यांना उद्देशून म्हणाले. 
 
पायावर उभे राहू द्या 
बँकेच्या विभाजनाबाबत नंदुरबार जिल्ह्यातील संचालक, सभासदांनी बँकेचे अध्यक्ष श्री. कदमबांडे यांना निवेदनही दिले. १ जुलै १९९८ ला नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर साधारण सर्व शासकीय व सहकारी संस्थांची कार्यालये नंदुरबारमध्ये निर्माण झाली. मात्र जिल्हा बँकेचे विभाजन झालेले नाही. सुरवातीच्या काळात बँकेची स्थिती चांगली नव्हती; मात्र आज बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. धुळे जिल्ह्याने मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे, तीच भूमिका स्वीकारून आम्हाला आमच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकेच्या विभाजनाचा ठराव घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com