अल्‍पवयीन मुलीची छेडखानी प्रकरण..दोंडाईचात पोलिसांसह रुग्णालयावरही हल्ला; हिंसाचारात तरुणाचा खून 

dondaicha crime matter
dondaicha crime matter

दोंडाईचा (धुळे) : येथील मेहतर कॉलनीतील अल्पवयीन मुलीच्या छेडखानी प्रकरणी बुधवारी (ता. ३१) सायंकाळनंतर दोन विभिन्न गटात वाद उफाळला. त्याला रात्री हिंसाचाराचे वळण लागले. एका गटाच्या संतप्त जमावाने संशयितांची सुटका होण्यासाठी थेट दोंडाईचा पोलिस ठाण्यावर दगडफेक करत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. तोच जमाव उपजिल्हा रुग्णालयाजवळ गेल्यावर दुसऱ्या गटातील तरुणांनी केलेल्या सशस्त्र हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोंडाईचा तणावसदृश स्थिती आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात पीडित मुलीची फिर्याद, पोलिसांवर हल्ला, गोळीबार आणि मारहाणीत तरुणाचा मृत्यू, असे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह अन्य अधिकारी स्थिती नियंत्रणासाठी तळ ठोकून आहेत. 

नेमकी घटना काय? 
मेहतर कॉलनीतील १७ वर्षीय मुलगी सायंकाळी शहरातील उड्डाणपुलाजवळ उभी होती. ती काकूची वाट पाहत असताना तिला पाहात चार तरुणांनी शिटी वाजविली. तसेच चौघांनी छेडखानीसह अश्लील वर्तणूक केली. त्यांच्यापासून काकूने तिची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार पॉक्सो कायद्यान्वये संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे, सहाय्यक निरीक्षक संतोष लोले यांनी बुधवारी रात्री अकराला मेहतर कॉलनीतील संशयित लुल्ल्या ऊर्फ शरीफ शेख सलीम शेख (वय २०), इम्रान शेख सलीम शेख (वय २४) याला ताब्यात घेतले. 

पोलिसांवर हल्ला, दगडफेक 
या पार्श्वभूमीवर संशयितांच्या समर्थक जमावाने संशयित दोघांची सुटका होण्यासाठी दोंडाईचा पोलिस ठाण्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात शाब्दिक चकमकीनंतर जमावाने पोलिस ठाण्यात बेकायदेशीररीत्या प्रवेश, तसेच दगडफेक केली. अधिकाऱ्यांसह इतर पोलिसांना धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळही केली. दरम्यान, संतप्त जमावानेही फिर्याद द्यावी, त्यांच्या मागणीनुसार योग्य ती कारवाई करू, विनाकारण बेकायदेशीर जमाव करू नये, कोरोनासारख्या महामारीत नियमांचे उल्लंघन करू नये, अशी सूचना निरिक्षक वारे देत होते. मात्र, जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. संशयितांना सोबत घेऊन जाऊ, असा जमावाचा आग्रह होता. जमाव पोलिसांवर चाल करून गेल्यावर परस्परांमध्ये झटापट झाली. त्या वेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम हवेत गोळीबार केला. तरीही स्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी कमरेच्या दिशेने दोन राउंड फायर केले. त्यात दोघे जखमी झाले. त्यांना नंतर धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दोघे संशयित पळाले 
तत्पूर्वी, पोलिस ठाण्याच्या आवारात तणावपूर्ण स्थिती असताना ताब्यातील दोघे संशयित पळाले. या स्थितीत सुमारे दीडशे ते दोनशेवर जणांच्या जमावाने हल्ला करत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिस निरीक्षक वारे यांनी फिर्याद दिली. दोन संशयितांना जबरदस्तीने सोडवून नेणे, पोलिसांवर हल्लाप्रकरणी शेख मोसीन शेख सिराज, नाजीम बशीर शेख, अमिन भट्टी, सुलतान खालिद पिंजारी, साजिद शाह मेहमूद शाह, कल्लू मेहमूद शाह, सईद मुसा खाटिक, कैसर मुसा खाटिक, तन्वीर करीम खाटीक, शाहबाज शाह गुलाब शाह, बिलाल युनूस खाटिक, कादीर नूर मोहम्मद, शरीफ शेख खाटिक, नूर निसार पिंजारी, धीरज भोला कापुरे, लुल्लाची आई व बहीण, इम्रान शेखची पत्नी यांच्यासह जमावावर गुन्हा दाखल झाला. 

शाहबाजचा खून 
गोळीबारातील कादीर नूर मोहमंद लोहार (रा. अशोकनगर, दोंडाईचा) याच्यासह दोघा जखमींना धुळ्यात रवाना करण्यापूर्वी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी पोलिस ठाण्याजवळील जमाव रुग्णालयाच्या दिशेने गेला. तेथे जखमींना पाहण्यासाठी आलेला भाजपचा पदाधिकारी आणि गेल्या पालिका निवडणुकीतील उमेदवार शाहबाज शाह गुलाब शाह (रा. गरीब नवाजनगर) या ४५ वर्षीय तरुणाचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात दुसऱ्या गटातील तरुणांनी लोखंडी बल्लीने वार करत खून केला. त्यात शाहबाजच्या डोक्यावर जबर वार झाल्याने त्याचा मेंदूच बाहेर आला. घटनास्थळावरील ही स्थिती शहारे आणणारी होती. या घटनेमुळे दोंडाईचा शहराची स्थिती अधिकच चिघळली. शाहसमर्थक संतप्त जमावाने रुग्णालयावरही दगडफेक केली. या प्रकरणी जुबेर शेख मुशीर (रा. अशोकनगर) यांच्या फिर्यादीनुसार संशयित दीपजित महाजन, चेतन राजपूत, युवराज पहेलवानसह १५ ते २० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. 

काय घडतेय दोंडाईचात..? 
जमावाच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकासह चार कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. ‘एलसीबी’चे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी बुधवंत, प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार सुनील सैंदाणे आदी ठाण मांडून आहेत. जिल्ह्यातील दंगल काबू पथक, राज्य राखीव पोलिस दलाचे कर्मचारी तैनात असल्याने दोंडाईचा शहराला छावणीचे स्वरूप आहे. गुरुवारी (ता. १) दुपारनंतर शहर पूर्वपदावर येत असले तरी तणावपूर्ण शांतता आहे. 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com