
शेतशिवारातच नव्हे तर गावांमध्ये त्यांचे येण्याचे प्रमाण वाढले आहे. एकटे आल्यानंतर देखील दहशत निर्माण होते. पण आता एकटे नव्हे तर जोडीने फिरत असल्याने त्यांची अधिकच दहशत जाणवू लागली आहे.
म्हसदी (धुळे) : येथील गावालगत बंदिस्त शेळ्यांच्या वाड्यात शुक्रवारी पहाटे बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घालत पाच शेळ्या फस्त केल्या. गावालगत बिबट्याची जोडी दाखल झाल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
येथील अमरावती नदीकिनारी घरालगत अनिल गंगाराम कुवर यांचा शेळ्यांचा वाडा आहे. शुक्रवारी पहाटे नदी किनारी बिबट्याच्या जोडीने हल्ला चढवत चार शेळ्या व एक बोकड फस्त केला. सकाळी श्री.कुवर वाड्यात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. वनविभागाला माहिती दिल्यावर वनपाल एस. डी. देवरे, वनरक्षक पी. जी. ऐलेवाड, सचिन भदाणे आदींनी पंचनामा केला.
हेपण वाचा- मनसेने दिला इशारा..अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्याची तयारी
एक वा दोन नाही तर चार बिबटे
दरम्यान, वनक्षेत्र किंवा शेतशिवारात दिसणारा बिबट्याचा मुक्त संचार गावकुशीकडे वाढल्याने मोठी धास्ती व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून चिंचखेडे व काकोर शिवारात चार बिबटे दिसले. शिवाय बुधवारी रात्री अमरावती नदीपात्रात अनेकांना बिबट्याच्या जोडीने दर्शन दिले. त्याच जोडीने शेळ्या फस्त केल्याची चर्चा आहे. तथापि काकोर शिवारात तर दररोज बिबट्या दर्शन देत असल्याची माहिती परिसरातील शेतकरी देतात.
गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान
गरीब कुटुंबातील एकाचवेळी तब्बल पाच शेळ्या फस्त झाल्याने सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. कुवर यांचे म्हणणे आहे. घरापासून खाली वीस फुटांवर अंतरावर बिबट्याच्या जोडीने पाच शेळ्यावर डल्ला मारला. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. बिबट्याचा बंदोबस्त करत भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.
धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
वसमार शिवारात कालवड
वसमार येथील शिवबान शिवारात रात्री बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. सुभाष गंगाराम देवरे यांची कालवड फस्त केली. वनकर्मचारी रमेश बच्छाव यांनी पंचनामा केला. वनक्षेत्रात यंदा मुबलक पाणी असले तरी भक्ष्याच्या शोधार्थ बिबटे शेतशिवार व गावकुशीकडे धाव घेत आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे