esakal | घरात करत होता रूग्‍ण तपासणी; पथकाची धडक अन्‌ उघडे पडले पितळ
sakal

बोलून बातमी शोधा

fraud doctor

पोलिसपाटील उत्तम मारनर यांना सोबत घेऊन पथकातील संबंधित अधिकारी गोकुळनगरीला पोहचले व चौकशी केली असता संबंधित नाना काशिराम बाचकर यांचे घरी रुग्ण तपासणी करत असल्याचे आढळले.

घरात करत होता रूग्‍ण तपासणी; पथकाची धडक अन्‌ उघडे पडले पितळ

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील वेहेरगाव (ता. साक्री) येथे विनापरवाना व अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सुमारे चार हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपीस शनिवारी (ता. २६) न्यायालयात हजर केले असता जामीनपात्र गुन्हा असल्याने न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. 

नक्‍की वाचा- नात्‍याला काळीमा..डॉक्‍टर चुलतभावानेचे काढले अश्‍लील फोटो अन्‌ केला अत्‍याचार

रामी (ता. शिंदखेडा) येथील मूळ रहिवासी व हल्ली वेहेरगाव (ता. साक्री) येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या नयनसिंग दिलीपसिंग गिरासे (वय ३८) नावाचा बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याबाबत वेहेरगावचे पोलिसपाटील उत्तम लहानू मारनर यांनी लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार धुळे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे साथरोग अधिकारी डॉ. राजेश्वर विश्वासराव पाटील व एमपीडब्ल्यू उदय पाटील यांनी शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी पाचला वेहेरगाव येथे येऊन नयनसिंग गिरासे यांच्याबाबत गावात चौकशी केली असता ही व्‍यक्‍ती गोकुळनगरी (ता. साक्री) येथे व्हिजिटसाठी गेल्याचे समजले. 

घरात करत होता तपासणी
दरम्यान पोलिसपाटील उत्तम मारनर यांना सोबत घेऊन पथकातील संबंधित अधिकारी गोकुळनगरीला पोहचले व चौकशी केली असता संबंधित नाना काशिराम बाचकर यांचे घरी रुग्ण तपासणी करत असल्याचे आढळले. संशयितास नाव, गाव व शिक्षण विचारले असता बीईएमएस (इलेक्ट्रोपॅथी) पदवीधारक असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधिताचे परवानगीने व्हिजिटिंग बॅग तपासली असता त्यात सुमारे चार हजार रुपये किमतीच्या ऍलोपॅथी औषधांसह रुग्ण तपासणीचे अन्य साहित्य आढळून आले. 

धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा

गुन्हा दाखल
त्यानंतर पंचांसमक्ष त्वरित पंचनामा करून संबंधित साहित्य जप्त केले व संशयितास मुद्देमालासह निजामपूर पोलिस ठाण्यात हजर केले. कोणत्याही प्रकारची अधिकृत वैद्यकीय पात्रता नसताना व वैद्यकीय परिषदेकडे नोंद केलेली नसताना अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेचे साथरोग अधिकारी डॉ. राजेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नयनसिंग गिरासेविरुद्ध शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शनिवारी (ता. २६) संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट घटनेचा पुढील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image