आता चहापाणी मग पार्टी; तत्‍पुर्वी तापतेय सोशल मिडीया

जगन्नाथ पाटील
Saturday, 19 December 2020

इच्छुकांनी यावेळेस माघार होणारच नाही. अशा पद्धतीने तयारी सुरू केली आहे. कोणीही आले समजावयाला तरी माघारच नाही. अशी भूमिका इच्छुकांनी घेतली आहे.

कापडणे (धुळे) : जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होईल. त्यापूर्वीच सोशल मीडियावरील डिजिटल बॅनर आणि ऑडीओ व व्हिडिओ बॅनर बाजीने वातावरण तापायला सुरवात झाली आहे. ‘बघताय काय, वाघ येतोय वाघ’ ही पोस्ट सर्वाधिक व्हायरल होत आहे. 

नक्‍की वाचा- बालिकेचा बळी तरीही प्रशासन गंभीर नाही; ठेकेदाराची पाठराखण 
 

तरुणांची डिजिटल आघाडी 
२०२० मधील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक तरुण उमेदवार पुढे येत आहेत. त्यांनी ‘अभी नही तो कभी नही’ असा नारा दिला आहे. डिजिटल प्रचार सुरू केला आहे. डिजिटल बॅनर्स, ऑडीओ व व्हिडिओ बनवून पोस्ट मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत. या डिजिटल वॉरने मोठे नेते हतबल झाले आहेत. त्यांना समजावे कसे हा त्यांच्या पुढील प्रश्न आहे. 

राम राम भाऊ बर शे का 
पंचायतीसाठी इच्छुकांनी ‘राम राम भाऊ बर शे का’ अशी आपुलकीची विचारपूस सुरू केली आहे. कधीही न बोलणारे आस्थेवाईकपणे पुढे येऊ लागले आहेत. पंचायतीसाठी इच्छुक असल्यानेच बहुरंगी चाली खेळू लागले आहेत. 

नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा.

या वेळेस नो माघार 
इच्छुकांनी यावेळेस माघार होणारच नाही. अशा पद्धतीने तयारी सुरू केली आहे. कोणीही आले समजावयाला तरी माघारच नाही. अशी भूमिका इच्छुकांनी घेतली आहे. त्यांची ‘नो माघारीचा’ निर्णयाने वरिष्ठ इच्छुक धास्तावले आहेत. 

चहापाणी झाले सुरू 
थंडीचा कडाका वाढला आहे. इच्छुकांनी चहापाणी पाजायला सुरवात केली आहे. चहाच्या टपऱ्याही गजबजू लागल्या आहेत. कोणी अतिआग्रहाने चहापाणीस बोलावीत असेल, तर त्यास हमखास इच्छुकांच्या यादीत गृहीत धरले जात आहे. अवघ्या तीन दिवसांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. त्यामुळे खरे इच्छुक लवकरच समजतील, हे मात्र निश्चित! 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat election social media war