बालिकेचा बळी तरीही प्रशासन गंभीर नाही; ठेकेदाराची पाठराखण 

nandurbar palika
nandurbar palika

नंदुरबार : कुत्र्याच्या चाव्यामुळे जीव गमवावा लागल्यावरही ठेकेदारांना पोसणारे नंदुरबार पालिकेचे प्रशासन आणि सत्ताधारी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर गंभीर बनलेच नाही. शिवाय मुख्याधिकारी कक्षाबाहेर खुद्द नगरसेवकांनी निदर्शने केली आणि पालिकेच्या दाराशी मृतांचे पालक व कार्यकर्ते उपोषणाला बसले असतानाही सत्ताधाऱ्यांनी बेफिकीर, निष्ठुर कार्यपद्धती जारी ठेवली आहे. असे हे कुंभकर्णी प्रशासन पुन्हा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत न्याय न मिळाल्यास शहरबंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिला आहे. 


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉ. चौधरी यांनी म्हटले आहे, की बेजबाबदार ठेकेदार, निर्बुद्ध प्रशासन आणि निष्ठुर सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. बालक आणि वृद्धांच्या श्वसन संबंधित आजाराला ते कारणीभूत ठरतात. अशा प्रसंगी वेळीवेळी शहरात औषध फवारणी करणे, कुत्र्यांना पकडून बंदोबस्त करणे, त्यांच्यावर उपचार करणे, नीर्बिजीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यावर गंभीर नाहीत. ही पद्धत नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणारी व निषेधार्ह आहे. 

कुत्र्यांनी घेतला बळी 
पालिका नागरिकांचे आरोग्य रक्षण आणि शहर स्वच्छतेत स्पशेल फेल ठरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने हिताक्षी माळी हिचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी कुत्र्यांचा झुंडीमुळे बलराज राजपूत या तरुणाचा जीव गेला. तरीही यांना जाग आलेली नाही. भाजपच्या नगरसेवकांनी नीर्बिजीकरणाच्या लाखो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या निष्ठुर कारभाराकडे लक्ष वेधले. मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना एक कोटीची भरपाई द्या, अशी मागणी लावून धरली. सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून घोषणाबाजी केली. शिवाय त्या मुलीला श्रद्धांजली वाहणारे बॅनर आणि पोस्टर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला लावून निदर्शनेही केली. त्या उपरांतही प्रशासन आणि सत्ताधारी कृतिशील होत नाहीत. 

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली 
हिंदू सहाय्य समितीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. १८) पाच दिवस उलटूनही पालिकेने दखल घेतलेली नाही. नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही. दोन दिवसांपूर्वी उपोषणकर्ते मुकेश माळी व मोहित राजपूत यांची प्रकृती खालावली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचापाठोपाठ नरेंद्र पाटील, मयूर चौधरी यांचीही प्रकृती खालावली. त्यांनाही रुग्णालयात दाखल व्हावे लागले. नगराध्यक्षांना त्यांनी निवेदन दिले आणि रुग्णालयातही उपोषण सुरू ठेवले. तरीही दखल घेतलेली नाही, याला काय म्हणावे, असा प्रश्न उपस्थित करीत न्यायासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा डॉ. चौधरी यांनी दिला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com