esakal | शासकिय रूग्‍णालयातील फायर सेफ्टी ‘वेटींग' मोडवर; एक्‍स्‍पायर डेटचे सिलेंडर 
sakal

बोलून बातमी शोधा

hire medical collage

शासकीय रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटल्स व इतर मोठ्या इमारतींच्या फायर सेफ्टीचा विचार केला तर सर्वकाही अप-टू-डेट आहे अशी स्थिती नाही. 

शासकिय रूग्‍णालयातील फायर सेफ्टी ‘वेटींग' मोडवर; एक्‍स्‍पायर डेटचे सिलेंडर 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालक अतिदक्षता कक्षाला आग लागून दहा कोवळ्या जिवांचा अंत झाल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना काल घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटल्सच्या फायर सेफ्टीची स्थिती पाहता सर्वकाही अलर्ट आहे अशी स्थिती नसल्याचे दिसते. कुठे आवश्‍यक यंत्रसामग्री बसविण्याचे काम अपूर्णच आहे तर कुठे प्राथमिक उपाययोजनांची स्थितीही अप-टू-डेट नाही. त्यामुळे भंडारा येथील दुर्दैवी घटनेचे चित्र डोळ्यासमोर ठेवून तरी यंत्रणेने अधिक संवेदनशिलपणा दाखविण्याची गरज आहे. 
अग्नी उपद्रवाच्या घटना विविध कारणांनी होतात. अशा आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी फायर सेफ्टीच्या अनुषंगाने घालून दिलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरते. धुळे शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटल्स व इतर मोठ्या इमारतींच्या फायर सेफ्टीचा विचार केला तर सर्वकाही अप-टू-डेट आहे अशी स्थिती नाही. 

सर्वोपचारमध्ये काम अपूर्णच 
चक्करबर्डी परिसरात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय तसेच शहरातील जुन्या सिव्हीलच्या इमारतीमधील फायर सेफ्टीचा विचार केला तर हिरे वैद्यकीयमध्ये फायर सेफ्टी प्रणाली (फायर फायटींग पाइपलाइन) चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ते कार्यान्वित होण्याचा प्रश्‍नच नाही. तेथेही अग्निशामक यंत्रावरच (fire extinguisher) मदार आहे. जुन्या सिव्हीलमध्येही तशीच स्थिती आहे. या दोन्ही ठिकाणी यावर्षी फायर ऑडिटचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 

केवळ ३०-४० नूतनीकरण 
धुळे शहरात एकूण १८३ हॉस्पिटल्स (शासकीय, खासगी) आहेत. यात बहुसंख्य हॉस्पिटल्स ही खासगी आहेत. यात काही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सदेखील आहेत. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये फायर फायटींग पाइपलाइन प्रणाली बसविल्याचे दिसते. इतर छोट्या हॉस्पिटलमध्ये गरजेनुसार प्राथमिक उपाययोजना केल्या जातात. मात्र, यावर्षी आत्तापर्यंत १८३ पैकी केवळ ३०-४० हॉस्पिटल्सचेच फायर ऑडिट (नूतनीकरण) झाले आहे. इतर हॉस्पिटल्सकडूनही मागणी झाली असून येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे महापालिकेचे साहाय्यक अग्निशमन अधिकारी तुषार ढाके यांनी सांगितले. 
 
एक्स्पायरी संपलेले सिलिंडर 
आपत्कालीन स्थितीत प्राथमिक स्तरावर उपयोगात आणली जाणारी अग्निशामक यंत्र ( (fire extinguisher) अनेक ठिकाणी लावलेले आढळून येतात. मात्र, या यंत्रांच्या रिफिलींग अथवा टेस्टची तारीख एक्सपायर झालेली असताना ती लटकलेली आढळतात. जिल्हाधिकारी कार्यालयात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्हा परिषदेत तर २०१४ मध्येच ड्यू डेट एक्स्पायर झालेली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे