विवाहानंतर मालदीवला गेलेले पती- पत्‍नी करताय याचना; पण कोणी एकेना अन्‌ आता भेटूही देईनात

husband wife
husband wife

चिमठाणे (धुळे) : विवाहानंतर फिरायला मालदीवमध्ये गेलेल्या मेथी (ता. शिंदखेडा) येथील नवदांपत्यापैकी पत्नीच्या तेथे केलेल्या चाचणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघांनाही स्वतंत्र दोन खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान, भारतातील ट्रॅव्हल्स कंपनी व तेथील हॉटेल व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नसल्याने नवदांपत्य खचले असून, यासंदर्भात वीरपालसिंह (उमेश) गिरासे यांनी ट्विटरद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडे भारतात परतण्यासाठी मदतीची याचना केली आहे. त्याची दखल घेत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल व राम सातपुते यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. 
शिंदखेडा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदा गिरासे व मेथी (ता. शिंदखेडा) येथील उपसरपंच नरेंद्रकुमार नथेसिंह गिरासे यांचे पुत्र वीरपाल व शेल्टी (ता. शहादा) येथील दरबारसिंह दलतपसिंह राठोड यांची कन्या दुर्गेश्‍वरी (पूजा) यांचा विवाह २८ फेब्रुवारीला शेल्टी येथे झाला होता. त्यानंतर १० मार्चला दोघे एका खासगी टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे पर्यटनासाठी मालदीवला गेले. तेथून १३ मार्चला ते भारतात परतणार होते. 

अन्‌ पत्‍नीला अहवाल पॉझिटीव्ह
मालदीवला जाताना त्यांनी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, मालदीवमध्ये एक दिवस फिरल्यानंतर काहीही कारण नसताना वा कोणतीही लक्षणे नसताना दोघांची पुन्हा कोरोना चाचणी घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर वीरपालने दोघांचा भारतातील तपासणी अहवालही दाखविला. तरीही त्यांना सक्तीने कोरोना चाचणी करावी लागली. या चाचणीत दुर्गेश्‍वरीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले. 

ट्रॅव्हल्‍स्‌ कंपनीचे हात वर
ट्रॅव्हल्स कंपनीने दुर्गेश्‍वरीला कोणतीही सुविधा देण्यास नकार देत फोन घेणेही बंद केले. ट्रॅव्हल्स कंपनी व संबंधित हॉटेल व्यवस्थापनाच्या वादात गिरासे दांपत्याला नाहक मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना खाण्यापिण्यासह कुठलीही वैद्यकीय सुविधा दिली जात नाही. तसेच रुग्णालयात दाखलही होऊ दिले जात नाही. एवढेच नव्हे, तर एकमेकांना भेटूही दिले जात नसल्याने दोघांना मोठा मनस्ताप होत आहे. त्यामुळे, आमची लवकर सुटका करावी, अशी विनंती वीरपालने भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडे ट्विटरद्वारे केली आहे. 

वीरपालसिंह व दुर्गेश्‍वरी यांचा कोरोना अहवाल नाशिक येथील प्रसिद्ध लॅबमधून करण्यात आला होता. तो अहवाल निगेटिव्ह आला होता. मालदीव येथील हॉटेलमध्ये योग्य सहकार्य मिळत नसल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात यावे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, राम सातपुते आदी भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 
- नरेंद्रकुमार गिरासे, वीरपालसिंहचे वडील 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com