esakal | बालकांना मारहाण केल्यास तीन वर्षे कैद; तक्रारीसाठी डायल करा १०९८
sakal

बोलून बातमी शोधा

Information of Child Welfare Committee

बालकांना मारहाण केल्यास तीन वर्षे कैद; तक्रारीसाठी डायल करा १०९८

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : बालन्याय अर्थात मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत मुलासोबत कोणत्याही प्रकारची क्रूर हिंसा, शारीरिक व मानसिक छळ, तसेच उपेक्षित वर्तणूक होत असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असेल तर हे कायद्याविरोधी आहे. अशा प्रकारे मुलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षे कैद व एक लाख किंवा त्या पटीत दंड आकारला जातो, अशी माहिती बालकल्याण समितीने दिली.

साक्री रोडवरील बालनिरीक्षणगृहात प्रथम न्यायदंडाधिकार प्रदान असलेल्या बालकल्याण समितीने बालकांची काळजी व संरक्षण या विषयावर बैठक घेतली. समितीसमोर येणारी प्रकरणे बिकट व भावनिक असतात. याअनुषंगाने चर्चेवेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, सदस्य प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड, ॲड. मंगला चौधरी, बालसंरक्षण कक्षाच्या तृप्ती पाटील उपस्थित होत्या. नगाव, मोहाडी, फागणे तसेच वीटभट्टी, बिलाडी यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आई-वडील, काका, इतर नातेवाइकांकडून बालकांना मारहाण केली जाते. तसेच क्रूर पद्धतीची वागणूक, पिळवणूक केली जाते. प्रसंगी अनेक जन्मदाते मद्याच्या नशेत बालकांना मारहाण करतात, भीक मागायला लावतात. असले गंभीर प्रकार कायद्याने गुन्हा आहे.

मारहाण होत असल्‍याचे आढळले तर डायल करा टोल फ्री

बालन्याय अधिनियमानुसार मुला-मुलीसोबत कोणत्याही प्रकारची क्रूर हिंसा, शारीरिक व मानसिक छळ, उपेक्षित वर्तणूक, दुर्लक्ष आणि दुर्वर्तन करणे गुन्हा आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला तीन वर्षे कैद व एक लाख किंवा त्या पटीत दंड आकारला जातो. त्यामुळे मुलांसोबत होणारी हिंसा टाळण्याबाबत व्यापक जनजागृतीची गरज व्यक्त झाली. एखाद्या मुलास मारहाण करताना पाहिले, की १०९८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. याकामी जिल्हा महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांचे मार्गदर्शन, तर बालसंरक्षण कक्ष व चाइल्ड लाइनचे सहकार्य असते, असे समितीने सांगितले.

loading image
go to top