शेती कामासाठी हवी होती आयशर..आता चव्हाण कुटूंबावर आली ही वेळ

सचिन पाटील
Friday, 18 December 2020

नेहमी शेतात जावे लागते. मग आपल्‍याला शेतात जाण्यासाठी आयशर असायलाच हवी; ही मोठी इच्छा. पण ही इच्छा काही पुर्ण झाली नसून आता चव्हाण कुटूंबाचे आयशरचे सोडा पण काही दिवस शेतात जाणे देखील बंद झाल्‍याची स्‍थिती आहे. नेमके काय कारण आहे हे वाचा सविस्‍तर

शिरपूर (धुळे) : शेती कामासाठी आयशर गाडीची अपेक्षा होती. पण हाती पैसा नव्हता. मग विवाहितेला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला. याकरीता तिचा छळ देखील सुरू करण्यात आला होता.

हेपण वाचा- गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल; चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप

शेतीकामासाठी माहेरून आयशर वाहन आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याच्या संशयावरून पाच जणांविरोधात थाळनेर (ता.शिरपूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजना सुनिल चव्हाण (वय 22, रा.पिंपळे तांडा ता.शिरपूर) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिने माहेरून शेतीसाठी आयशर वाहन घेऊन यावे अशी मागणी चव्हाण कुटुंबाने केली. तिची पूर्तता न झाल्याने तिचा सासरी व माहेरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. संशयित पती सुनिल चव्हाण, सासरा देशमुख चव्हाण, सासू जिजाबाई चव्हाण, दीर जगदीश चव्हाण (सर्व रा.बोळे तांडा ता.पारोळा जि.जळगाव) व नणंद सुरेखा विलास राठोड (रा.न्यायडोंगरी ता.नांदगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून हवालदार शेख तपास करीत आहेत.

धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा.

प्रौढाने केली आत्‍महत्‍या
वाघाडी (ता.शिरपूर) येथील प्रौढाने 17 डिसेंबरला सायंकाळी साडेसातला गळफास लावून आत्महत्या केली. सोमनाथ ओंकार कोळी (वय 50) असे मृताचे नाव आहे. राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. भाऊ बुधा ओंकार कोळी याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार जी. एन.सत्तेसा तपास करीत आहेत.

अपघातात युवक ठार
भरधाव दुचाकीने मागाहून धडक देऊन झालेल्या अपघातात युवक ठार झाला. हा अपघात 15 डिसेंबरला रात्री एकला सांगवी (ता.शिरपूर) शिवारात हाडाखेड- सांगवी रस्त्यावर घडला. दिलवरसिंह सुरसिंह पावरा (वय 35, रा.बुडकीविहिर ता.शिरपूर) हा या अपघातात मृत्युमुखी पडला. तो दुचाकी (एमएच 18 एइ 8611) ने जात असतांना मागून येणाऱ्या दुचाकी (एमएच 18 एडी 9440) ने त्याला जोराची धडक दिली. रस्त्यावर आढळून गंभीर जखमी झाल्याने दिलवरसिंह ठार झाला. संशयित दुचाकीस्वार पळून गेला. मदन कंज्या पावरा (रा.बुडकीविहिर) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक उपनिरीक्षक डी.टी. बाविस्कर तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shirpur family aicher vehical chavan family fir