शिरपूर उपजिल्हा रुग्णालय झाले कोविड हॉस्पिटल

Shirpur Sub-District Hospital
Shirpur Sub-District Hospital

शिरपूर (धुळे) : शहरासह तालुक्यात कोरोनाचा वेगवान संसर्ग लक्षात घेऊन येथील प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी उपजिल्हा रुग्णालयास संपूर्ण कोविड १९ रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्ण दाखल झाल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी थाळनेर (ता.शिरपूर) येथील ग्रामीण रुग्णालयात सुविधा असून संबंधित वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडावी असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. पी. सांगळे यांनी दिले. 

शहर आणि परिसरात दररोज कोविड १९ विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. गंभीर लक्षणे असलेले, ऑक्सिजनची आवश्यकता असलेले, वृद्ध आदी रुग्णांवर उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर आहे. सध्या या रुग्णालयात कोरोनाशी संदर्भित तपासण्या, औषधोपचार व अन्य उपचार यावर सर्वाधिक भर आहे. कोरोनाप्रसाराची परिस्थिती आणखी बिकट झाल्यास बेड्सची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे. याशिवाय कोरोनाचे निष्पन्न रुग्ण, संशयित प्रसारक आणि त्यांच्यामुळे इतर कोरोनाबाह्य आजारांचे रुग्ण, प्रसूतीसाठी दाखल स्त्रिया, अपघाताचे रुग्ण आदींना होऊ शकणारा धोका पाहता प्रांताधिकारी बांदल यांनी उपजिल्हा रुग्णालयास संपूर्ण कोविड हॉस्पिटल (डीसीएचसी) घोषित केले आहे. 

थाळनेरला नॉन कोविड रूग्‍णांची सुविधा
कोरोनाबाह्य व अन्य गरजू रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सांगळे यांनी बुधवारी (ता.२४) थाळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसाठी आदेश जारी केला. शिरपूर परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून असे रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास त्यांना आवश्यक ती रुग्णसेवा उपलब्ध करून द्यावी, विषबाधा, हाणामारी, अटकपूर्व वैद्यकीय तपासणी आदी न्यायवैद्यकीय प्रकरणे व्यवस्थित हाताळावीत. त्यात कोणताही हलगर्जीपणा झाल्यास त्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांची असेल असे डॉ. सांगळे यांनी आदेशात म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com