नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यास सज्ज व्हा : अब्‍दुल सत्‍तार

धनंजय सोनवणे
Friday, 12 February 2021

शिवसेना पक्षात नवीन कार्यकर्ते येत असले, तरी जुन्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांच्या सहकार्यातून शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम केले जाणार असल्याचे सांगितले.

साक्री (धुळे) : शिवसेना दिलेले वचन पाळणारा पक्ष असून, याचा प्रत्यय वेळोवेळी आलाय. त्यामुळे मी शहरवासीयांना वचन देतो, शहराच्या विकासाची घोडदौड अशीच पुढे ठेवली जाईल; किंबहुना अन्य प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. त्यासाठी आगामी काळात नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले.

नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशवेळी मंत्री सत्तार बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार मंजुळा गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, हेमंत साळुंके, तालुकाप्रमुख पंकज मराठे, माजी तालुकाप्रमुख विशाल देसले, नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, महिला आघाडीच्या कविता क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी, श्री.नागरे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही
पालकमंत्री सत्तार म्हणाले, की शिवसेना पक्षात नवीन कार्यकर्ते येत असले, तरी जुन्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांच्या सहकार्यातून शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम केले जाणार असल्याचे सांगितले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन करताना सत्तेशिवाय शहाणपण नसल्याचे सांगत सत्तेच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी माझ्यासह श्री. नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काम करणाऱ्याला जात पाहून नव्हे; तर काम पाहून मत मिळतात. यामुळे आजवर शहराने श्री. नागरे यांना साथ दिली असून यापुढील काळात देखील शहरात विकासाचे नवे पर्व आणण्यासाठी शहरवासीयांनी श्री.नागरे यांना साथ द्यावी असे आवाहन श्री.रघुवंशी यांनी केले. 

यांनी केला प्रवेश
मेळाव्यात गटनेते ज्ञानेश्वर नागरे, नगराध्यक्ष अरविंद भोसले, नगरसेवक सुमित नागरे, प्रमोद येवले, राजेंद्र टाटीया, अमित नागरे, राहुल भोसले, युवराज मराठे, गोटू जगताप, माजी नगराध्यक्षा सोनल नागरे आदींसह श्री. नागरे समर्थक सर्व नगरसेवक, अकबर शेख, अपर्णा भोसले यांच्यासह शेकडो समर्थक, कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shiv sena minister abdul sattar