सरपंचपद अनुसूचित जमाती महिला राखीवने दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणी; सोबतच उपसरपंचासाठीही रस्‍सीखेच 

एल. बी. चौधरी
Sunday, 31 January 2021

एकहाती विजय मिळवत विरोधकांवर मात केली. विजयी १७ पैकी १३ सदस्य आमचे असल्याचा दावा श्री. महाजन यांनी केला. सरपंच त्यांच्या गटाचा सदस्य होईल, अशी अपेक्षा असताना सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने श्यामलाल मोरे गटाने फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.

सोनगीर (धुळे) : येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे म्हणजेच पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांचे वर्चस्व असताना सरपंच आरक्षण अनुसूचित जमातीचे म्हणजेच भाजपप्रणीत निघाल्याने अविनाश महाजन यांच्या गटाची संधी हुकली आहे. अद्याप सरपंच व उपसरपंच निवडणूक जाहीर झाली नाही. मात्र तत्पूर्वीच उपसरपंचपद कोणता गट मिळवतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 
निवडणुकीत महाजन यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांवर मात केली. विजयी १७ पैकी १३ सदस्य आमचे असल्याचा दावा श्री. महाजन यांनी केला. सरपंच त्यांच्या गटाचा सदस्य होईल, अशी अपेक्षा असताना सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने श्यामलाल मोरे गटाने फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. सरपंचपदासाठी रुखमाबाई ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर उपसरपंचदेखील आपल्याच गटाचा पाहिजे, असा प्रयत्न होत आहे. दोन्ही गटांकडून उपसरपंचसाठी प्रयत्न सुरू असल्याने गावात चर्चेचा विषय असून, प्रत्यक्ष सरपंच व उपसरपंच निवडणूक लागल्यानंतर राजकीय डावपेचाला उधाण येईल, अशी स्थिती आहे. आमदार कुणाल पाटील व भाजपचे मनोहर भदाणे निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. उपसरपंचपदासाठी इच्छुकांची नावेही अद्याप गुलदस्त्यात आहेत. आमचे तेरा सदस्य असल्याने त्यांच्यापैकी एखाद्या सदस्याचे नाव ऐनवेळी जाहीर करून उपसरपंच केला जाईल. तसेच गावाचा विकास व्हावा म्हणून भावी सरपंच रुखमाबाई ठाकरे यांना आमच्या गटाचे सहकार्य कायम राहील, अशी भूमिका महाजन यांनी स्पष्ट केली. तर दुसरा गट उपसरपंचपदासाठी केदारेश्वर मोरे यांची पत्नी देवकन्या मोरे यांना गळ घालत आहेत. 
 
सदस्यांची भूमिका अस्पष्ट 
बहुतांश सदस्य आपल्याच गटाचे असल्याची खात्री दोन्ही गटांना वाटत असली तरी काही सदस्यांची भूमिका अस्पष्ट आहे. भाजप व काँग्रेस पक्षाचे गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असले तरी त्यांच्या गटातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांचेही आहेत. पक्षविरहित निवडणूक झाली असल्याने गटनेता कोणत्या पक्षाचे आहे, हे न पाहता त्यांचे कार्य पाहून सदस्यांची विभागणी झाली आहे. तरीही काही सदस्यांचे नेमके कोणाच्या गटात सामील व्हावे हे ठरले नसल्याने ते दोन्ही गटाला होकार देत आहेत. यापार्श्वभूमीवर उपसरपंच निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. 
 
सरपंचपदाचे आरक्षण आमच्या गटाचे निघाल्याने विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. आता उपसरपंचही आमच्याच विचारांचा असावा, असा प्रयत्न करणार आहोत. 
- मनोहर भदाणे, भाजप नेते 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news songir gram panchayat sarpanch reservation