esakal | महामार्गावर कंटेनरने उडविले, एकाचा मृत्‍यू; नागरीकांचा रास्‍ता रोको
sakal

बोलून बातमी शोधा

accident

सोनगीरकडून वाघाडीकडे महामार्ग ओलांडताना शिरपूरहून धुळ्याकडे वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (क्र. जीजे 03, बी डब्‍ल्यू 9881) मोटारसायकलला उडवले. या धडकेत मोटारसायकल कंटेनरखाली अडकून सुमारे एक किलोमीटर अंतर ओढत नेले.

महामार्गावर कंटेनरने उडविले, एकाचा मृत्‍यू; नागरीकांचा रास्‍ता रोको

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : मुंबई- आग्रा महामार्गावर सोनगीरजवळील वाघाडी फाट्यावर कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका जणाचा जागीच मृत्‍यू झाला; तर एक जबर जखमी आहे. सदर घटनेनंतर वाघाडी फाट्यावर होणाऱ्या वारंवार अपघातांमुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोकून धरला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दोन दिवसात गतिरोधक बसविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेपण वाचा- अनोखे सारे.. ‘गल्ली तेथे फळा आणि फळा तेथे शाळा’ 


भडगाव वर्धाने (ता. साक्री) येथील अण्णा सुकदेव सोनवणे व देविदास सुकदेव सोनवणे हे दोन्ही भाऊ मेंढा घेऊन वालखेडा (ता.शिंदखेडा) येथे मोटारसायकलने (क्र. एमएच 15, सीए 3750) जात होते. सोनगीरकडून वाघाडीकडे महामार्ग ओलांडताना शिरपूरहून धुळ्याकडे वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (क्र. जीजे 03, बी डब्‍ल्यू 9881) मोटारसायकलला उडवले. या धडकेत मोटारसायकल कंटेनरखाली अडकून सुमारे एक किलोमीटर अंतर ओढत नेले. अपघातात अण्णा भिल हा जागीच ठार झाला. तर देविदास भिल अत्यवस्थ असून मेंढाचाही बळी गेला. मयताच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्याचा डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दरम्यान कंटेनर चालक संजय लालजी यादव (वय 27, राहणार मांडवा, जिल्हा जौनपुर उत्तर प्रदेश) यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा.

उड्डाणपुल नाही, की सर्व्हीस रोड नाही
अंगावर शहारे आणणारे ते दृश्य होते. मयताला येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. जखमीला धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या जागी उड्डाणपूल नाही, सर्व्हीस रोड नाही. त्यामुळे वाहनांना अमळनेरकडून येणाऱ्या किंवा सोनगीरहून अमळनेर जाणाऱ्या वाहनांना महामार्ग ओलांडावा लागतो.

रास्‍ता रोकोने वाहनांच्या रांगा
महामार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढते. वारंवार अपघात होऊनही चौपदरीकरण करणाऱ्या टोलप्लाझा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी रस्ता रोको केले. परिणामी दोन्ही ट्रकवर एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी जनतेची समजूत घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारींशी बोलून दोन दिवसात गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते हटले. 

संपादन ः राजेश सोनवणे