शेतकऱ्यास तळोदा तहसीलदारांच्या नावे बनावट दाखला 

फुंदीलाल माळी
Tuesday, 22 December 2020

गृहस्थांनी तळोदा तहसील कार्यालयातून असे दाखले दिले जात असल्याचे सांगितले व आपल्या मोबाईलमधील तळोदा तहसील कार्यालय असे लिहिलेला शेतकरी असल्याचा दाखला दाखविला.

तळोदा (धुळे) : धुळ्याच्या नायब तहसीलदारांची स्वाक्षरी असलेला बनावट शेतकरी दाखला धुळ्याच्या सेवा केंद्रातून मिळाल्याचा प्रकार येथील तहसीलदार गिरीश वखारे यांनी उघडकीस आणला. 
येथील तहसील कार्यालयातून तसा दाखला देण्यात न आल्याचे उघड झाल्यावर तहसीलदारांनी चौकशीसाठी धुळ्याला पत्र पाठवून खात्री केली आहे. त्यातून ही बाब उघडकीस आली. या प्रकाराची अधिक चौकशी केल्यास यात मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते. 
तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी चोपडा येथील रहिवासी असलेले गृहस्थ शेतकरी असल्याचा दाखला मागणीसाठी आले होते. त्या गृहस्थांना तहसीलदारांनी आपली शेतजमीन ज्या तालुक्यात असेल तेथील तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे सांगितले. मात्र, त्या गृहस्थांनी तळोदा तहसील कार्यालयातून असे दाखले दिले जात असल्याचे सांगितले व आपल्या मोबाईलमधील तळोदा तहसील कार्यालय असे लिहिलेला शेतकरी असल्याचा दाखला दाखविला. तो दाखला पाहून तहसीलदारांनी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून चौकशी केली. त्या वेळी हा दाखला तळोदा तहसील कार्यालयातून देण्यात आलेला नाही, असे समजले. 

केंद्राचा पत्‍ताही नाही
दाखल्यावरील डिजिटल स्वाक्षरीखाली असलेले नाव व सेवा केंद्राचा पत्ता तळोद्यातील नव्हता. दाखल्यावरील डिजिटल सही व ई-सेवा केंद्र धुळे येथील असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तहसीलदारांनी धुळे तहसील कार्यालयात दाखल्याची शहानिशा केली. तेथील तहसील कार्यालयातून असे दाखले वितरित होत असल्याचे लक्षात आले. दुसरीकडे महाऑनलाइन पोर्टलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी असल्याचा दाखला देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे महाऑनलाइन पोर्टलने तो दाखला रद्द केल्याचे सांगितले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे दाखले देण्यातील गोंधळ उजेडात आला आहे. 
 
ज्या जिल्ह्यात व तालुक्यात शेतजमीन असेल तिथूनच शेतकरी असल्याचा दाखला मिळविणे अपेक्षित असते. त्यामुळे तळोदा लिहिलेला दाखला आढळल्याने मी तातडीने पडताळणी केली. दाखला तळोदा कार्यालयातून दिला नाही, याची खात्री करून धुळे येथे पत्राद्वारे कळविले. तो दिलेला दाखला महा ऑनलाइननेही रद्द केला आहे. त्यामुळे नागरिकांनी दाखल्यांसंदर्भात तहसील कार्यालयात संपर्क करावा. 
-गिरीश वखारे, तहसीलदार, तळोदा 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news taloda farmer fake certificate in the name of tehsildar