तीन महिन्यांपुर्वी प्रसूती..अचानक महिलेचे हृदय पडले बंद; सुरू झाली धावपळ अन्‌

निखील सुर्यवंशी
Sunday, 3 January 2021

तीन महिन्यांपुर्वीच प्रसुती झालेल्या या महिलेचे हृदय सामान्य व्यक्तीपेक्षा फक्त १० ते १५ टक्केच काम करत होते. ज्यामुळे महिलेची अवस्था अत्यवस्थ झाली होती.

धुळे : लळींग येथील एका अत्यवस्थ महिलेचे बंद पडलेले हृदय पुर्ववत सुरू करून जीवदान देण्याचे काम जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या अतिदक्षता (आयसीयू क्रिटीकल केअर टिम) विभागातील डॉक्टरांनी व नर्सिंग टिमने करून दाखवले आहे. वेळीच तातडीने उपचार केल्यामुळे सदर महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. 

हेपण वाचा- नाव तिचे करिना..जगावेगळी कौशल्‍ये आत्‍मसात; पण करिश्‍मा झाला उघड

काही दिवसांपुर्वीच मोर- शेवडी, लळींग येथील एकवीस वर्षीय महिलेस रूग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल केले होते. सदर महिलेच्या हृदयाची क्रिया पुर्णपणे मंदावली होती, तिच्या शरीरावर सूज येऊन शरीरात पाणी झाले होते व श्वास घेण्यास अडचण येत होती. तीन महिन्यांपुर्वीच प्रसुती झालेल्या या महिलेचे हृदय सामान्य व्यक्तीपेक्षा फक्त १० ते १५ टक्केच काम करत होते. ज्यामुळे महिलेची अवस्था अत्यवस्थ झाली होती. 

बाळासह ती अतिदक्षता विभागात
तीन महिन्यांच्या बालकासह या महिलेला तातडीने अतिदक्षता विभागात डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले. तिच्या बाळाची व तिची प्रकृती लक्षात घेऊन अत्यावश्यक औषधोपचार करत तिला नैसर्गिक श्वास घेता यावा, यासाठी अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व महिलेच्या शरीरावरील सूज कमी होऊन पाण्याची पातळी नियंत्रित होत सात दिवसांत महिला पुर्णपणे बरी झाली. 

धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्‍लिक करा.

अशा केस दुर्मिळ
दरम्यान प्रसूतीनंतर बाळाच्या अँन्टिबॉडीजमुळे अनेकदा महिलांना हृदयाच्या क्रिया मंद होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे मृत्यूचा धोकाही अधिक असतो. अशाप्रकाच्या केसेस दुर्मिळ असल्या तरी त्यावर तत्काळ उपचार झाले तरच रूग्णाचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या रूग्णाच्या उपचारासाठी मेडिसीन विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, उपअधिष्ठाता डॉ. आरती कर्णिक महाले यांनी अतिदक्षता विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news women delivery after three month woman's heart stopped beating