नाशिकमधील "आधार" धुळ्यात अपडेट! 

विलास पाटील
Thursday, 12 March 2020

देशात आधार नोंदणीची प्रक्रिया झाली असली, तरी प्रत्यक्षात तत्कालीन कर्मचाऱ्यांचे झालेले अपूर्ण प्रशिक्षण, गर्दी पाहून होत असलेले काम व ऑनलाइन यंत्रणेतील समस्यांमुळे आधारकार्डमध्ये अनेक चुका झाल्या. जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आदी रकाने भरणे आवश्‍यक असतानाही कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत रकाने कोरे ठेवले.

धुळे : शासनाने विविध योजनांसाठी आधारकार्ड सक्‍तीचे केले. त्यातच "एनआरसी", "सीएए" कायद्याच्या भीतीपोटी नागरिकांनी युद्धपातळीवर अद्ययावतीकरण (अपडेट) सुरू केले. नाशिक जिल्ह्यातील आधार केंद्रांवर गर्दी होत असल्यामुळे तेथील नागरिक चक्क धुळे जिल्ह्यातील आधार केंद्रांवर रांगा लावून आहेत. धुळे जिल्ह्यात सर्व मिळून 110 टक्‍के लोकांची नोंदणी झाली आहे. 
देशात आधार नोंदणीची प्रक्रिया झाली असली, तरी प्रत्यक्षात तत्कालीन कर्मचाऱ्यांचे झालेले अपूर्ण प्रशिक्षण, गर्दी पाहून होत असलेले काम व ऑनलाइन यंत्रणेतील समस्यांमुळे आधारकार्डमध्ये अनेक चुका झाल्या. जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आदी रकाने भरणे आवश्‍यक असतानाही कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत रकाने कोरे ठेवले. काही कार्डमध्ये चुकीची तारीख, क्रमांक व पत्ते टाकले. शासनाने सर्व शासकीय योजना, बॅंक खाते, कर्जप्रकरणे, संपत्तीचे व्यवहार आदींसाठी आधारकार्ड अनिवार्य केल्यानंतर नागरिकांना याचा त्रास व्हायला सुरवात झाली. त्यातच राष्ट्रीय नागरिक नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायद्यांच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये आधार अद्ययावतीकरण करण्याची लगबग सुरू आहे. 

क्‍लिक करा - अमरिशभाई पटेलांनी विधानपरिषेदेचा भरला अर्ज 

धुळे जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार 20 लाख 50 हजार 862 तर डिसेंबर 2015 अखेर 21 लाख 69 हजार 504 लोकसंख्या होती. जनगणनेनुसार 110. 87 टक्‍के, तर डिसेंबर 2015 च्या डाटानुसार 104. 81 टक्‍के आधार नोंदणी झाली आहे. एक मार्चनंतरही नोंदणी सुरूच असून, जिल्हा नोंदणीबाबत निश्‍चित उद्दिष्टांपेक्षा पुढे असल्याचे दिसते. 

हेपण पहा -नंदुरबारमधील तो रूग्ण कोरोनाचा नाही 
 
आधार केंद्रांची संख्या कमी 
जिल्ह्यात अनेक आधार केंद्रे बंद आहेत. सद्यःस्थितीत सरासरी 30 केंद्रे सुरू आहेत. एका केंद्रावर दिवसभरात फक्‍त 25 ते 30 कार्डचे अद्ययावतीकरण होते. मात्र, नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळे दिवसभर रांगा लावूनसुद्धा अनेक नागरिकांचे काम होत नाही. सुमारे 20 ते 25 गावांच्या परिसरात फक्‍त एकच केंद्र आहे. काही केंद्रांवर किट उपलब्ध नाही. जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. 
 
नागरिकांना भुर्दंड 
अद्ययावतीकरणासाठी 50 रुपये शुल्क घेतले जाते. सरासरी वीस किलोमीटरवरील गावांमधील केंद्रावर ये-जा करण्यासाठी प्रसंगी वाहन उपलब्ध नसते. पहिल्या दिवशी काम न झाल्यास दोन दिवसाचे भाडे वाया जाते. दोन दिवस रोजंदारीला मुकावे लागते. तत्कालीन कंत्राटी नोंदणी कर्मचाऱ्यांच्या चुकांचा भुर्दंड नागरिकांना बसत आहे. 
 
दिरंगाईची झळ नागरिकांना 
मालेगाव (जि. नाशिक) येथे आधार केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे नागरिक अद्ययावतीकरणासाठी भाड्याने वाहने करून धुळे जिल्ह्यातील केंद्रांवर येत आहेत. त्यातच धुळे जिल्ह्यातील नागरिकसुद्धा रांगा लावत असल्याने गर्दी होत आहे. शासनाच्या दिरंगाईची झळ नागरिकांना पोहचत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aadhar updation nashik city people dhule aadhar center